पुढारी ऑनलाईन : राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटींची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवारी विधानसभेत सादर केला. राज्यातील पर्यटक आणि भाविकांना किफायतशीर दरामध्ये उत्तम सुरक्षित सुविधा पुरवण्यासाठी श्रीनगर, जम्मू काश्मीर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना दिली. (Maharashtra Budget 2024)
राज्यात नवीन सुक्ष्म व लघू उद्योग धोरण लागू केले जाणार आहे. दाओसमधील करारानुसार ३ लाख रुपयांची गुंतवणूक झाली असून २ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या मौजे वडज इथे शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. यात वस्तुसंग्रहालय, शिवकालीन गाव, किल्ल्यांची प्रतिकृतींचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.
प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करुन छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी वीर जिवा महाला यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे.
"आम्ही २०२४-२५ मधील ५ महिन्यांसाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहोत. उर्वरित अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या पुढील अधिवेशनात सादर केला जाईल," असेही ते म्हणाले.
क्रीडा विभागासाठी ५३७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत १० पट वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी १ कोटी, रौप्य पदकासाठी ७५ लाख, कांस्य पदकासाठी ५० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येतील, अशीही घोषणा अजित पवार यांनी केली.
हे ही वाचा :