सलमान खानला धमकी दिल्याच्या प्रकरणात महाकाळकडे चौकशी

साैरभ महाकाल
साैरभ महाकाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंजाब येथील प्रसिध्द गायक सिध्दू मुसेवाला यांच्या खुनात बिष्णोई टोळीतील पुण्यातील हस्तक संतोष जाधव व त्याला आश्रय देणारा संशयीत गुंड सिध्देश कांबळे उर्फ महाकाळ असल्याचे तपासात समोर आले. फरार असलेल्या महाकाळला पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्यात अटक केली. सिनेअभिनेता सलमान खान याला आलेल्या लेखी धमकी प्रकरणात गुरूवारी मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकार्‍यांनी पुण्यात येऊन महाकाळ याची चौकशी केली.

बांद्रा पोलिस ठाण्यात सलमान खानला आलेल्या धमकिबद्दलचा गुन्हा दाखल आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात 29 मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लॉरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. मुसेवालावर गोळ्या झाडणार्‍या दहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाळ मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आरोपी आहेत. याच बिष्णोई टोळीचा म्होरक्या लॉरेन्स याने काही वर्षापूर्वी सलमान खान याला धमकी दिली होती.

मुसेवालाच्या हत्येनंतर सलमानला लेखी धमकी देण्यात आली होती. त्यात बिष्णोई टोळीचा सहभाग असल्याची दाट शक्यता मुंबई क्राईमब्रांचला असल्याने बिष्णोई टोळीचा हस्तक संतोष जाधव असून त्याला महाकालने आश्रय दिल्याने त्याच्याकडे या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.

आंबेगावमध्ये खून करून झाले होते फरार

संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांनी गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यात ओंकार बाणखेले याचा वैमनस्यातून गोळ्या झाडून खून केला होता. तेव्हापासून दोघेजण पसार होते. जाधव आणि महाकाळ पंजाब, राजस्थानात पसार झाले होते. राजस्थानात खंडणीसाठी एका व्यावसायिकावर गोळीबार केल्या प्रकरणी जाधवला अटक करण्यात आली होती. राजस्थानातील कारागृहात तो लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाली. नुकताच महाकाळ याला अटक करण्यात आली. मात्र जाधव अद्याप फरार आहे.

ग्रामीण पोलिसांकडून बाणखेले याच्या खूनाचा तपास सुरू आहे. अभिनेता सलमान खान याला आलेल्या धमकीच्या अनुषंगाने मुंबई क्राईम ब्रांचच्या टिमने महाकाल याच्याकडे चौकशी केली. आम्ही केवळ बाणखेले याच्या खूनाच्या अनुषंगाने तपास करत आहोत. मुसेवाला हत्येच्या अनुषंगानेही आम्ही चौकशी करत नसून संबधीत यंत्रणा याबाबत महाकाळकडे चौकशी करतील.

                                    – अशोक शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news