महाड ; पुढारी वृत्तसेवा महाडमध्ये मागील महिनाभरापासून घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडूनही सतर्कता बाळगली जात आहे. काल (शनिवार) सायंकाळी दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेतील संशयीत आरोपीस महाड शहर पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे व महाड नवी पेठ येथील जागरूक युवकांनी दिलेल्या तातडीच्या साथीमुळे मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या महाड शहरातील भर वस्तीमध्ये असलेल्या तांबट अळीतील मुख्य शाखेच्या इमारतीमधील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. एका युवकाकडून हा चोरीचा प्रयत्न होतानाची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याची गंभीर नोंद घेऊन महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निकेत पंढरीनाथ वार्डे 844 व पोलीस शिपाई रामसेवक ज्ञानोबा कांदे 2074 यांनी या इसमाचा शोध घेण्याकरता शहरात केलेल्या फेरफटका दरम्यान गाडी तळामध्ये आले असताना रात्री साडेनऊच्या सुमारास एका दुकानाजवळ संशयित दोन व्यक्ती आढळून आल्या.
त्यावेळेस त्यांनी तातडीने आपल्या सहकार्यांबरोबर केलेल्या मसलतीने त्यातील एकाला ताब्यात घेण्यात त्यांना यश आले, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता, त्याला पोलिसांकडून करण्यात आलेल्या आरडाओर्डीमध्ये नवी पेठेतील एक 40 वर्षीय युवकाने जागरूकता व समय सूचकता दाखवत पकडले. पोलिसांच्या या प्रयत्नांमध्ये सामान्य नागरिकांनीही दिलेल्या योगदानाबद्दल शहरातील नागरिकांकडून पोलिसांसह या युवकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
केवळ चार तासाच्या आत पोलिसांना आलेल्या या यशानंतर स्थानिक नागरिकांकडून या दोन्हीही चोरट्यांना चोप देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांची पोलीस ठाण्यामध्ये रवानगी करण्यात आली.
या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या दोन्ही आरोपींकडून बँकेत करण्यात आलेल्या एटीएम फोडीच्या प्रयत्नाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या दोन आरोपींपैकी एकाचे नाव सराफत अजमत खान राहणार कैथवाडा भरतपूर राजस्थान असून, दुसऱ्याचे नाव गुलाब इलियास खान राहणार मुबारकपूर मेवात हरियाणा असे असल्याचे सांगण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेल्या खात्रीशीर वृत्तानुसार या दोन्हीही आरोपींकडून नऊ व बारा विविध बँकांची एटीएम कार्ड प्राप्त झाल्याचे समजते. तसेच या दोघांवर मुंबई परिसरात एटीएम फोडीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.
हेही वाचा :