पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण? या चर्चेला आज ( दि.११) पूर्णविराम मिळाला. मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी प्रवर्गातून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. तर जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला हे दोघे मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री असणार आहेत. (Madhya Pradesh New CM)
३ डिसेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभेचा निकाल जाहीर झाला. यानंतर तब्बल ९ दिवस मुख्यमंत्रीपदासाठी खलबतं सुरु होते. आज मध्य प्रदेशमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. भाजपचे सर्व नवर्निवाचित आमदार या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मोहन यादव यांच्या नावावर अखेर मोहर उमटविण्यात आली. ( Madhya Pradesh New CM )
मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित करण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भाजपने पक्ष निरीक्षकांची नावांची घोषणा केली होती. मध्य प्रदेशसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष के लक्ष्मण आणि पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आशा लाक्रा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेश मुख्यमंत्रीपदाच्या शर्थती शिवराजसिंह चौहान यांच्यासह प्रल्हाद पटेल, विष्णु दत्त शर्मा, ज्योतिरादित्य शिंदे यांचेही नाव चर्चेत होती. मात्र अखेर मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. (Madhya Pradesh New CM)
मोहन यादव हे दक्षिण उज्जैनचे आमदार आहेत. शिवराज सिंह सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते. मोहन यादव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अगदी जवळचे मानले जातात. संघातील अनेक पदांवर त्यांनी दीर्घकाळ काम केले असून विद्यार्थी परिषदेतही त्यांनी काम केले आहे. मोहन यादव हे ओबीसी प्रवर्गातून येतात.