पुढारी ऑनलाईन डेस्क : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या आरएनएम मुव्हिंग पिक्चर्स निर्मित 'पंचक' या चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) परिक्षकांकडून उत्कृष्ट पटकथेच पारितोषिक मिळाले आहे. (Panchak Movie) माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या आरएनएम मुव्हिंग पिक्चर्सने आपला मराठी चित्रपट 'पंचक' येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) दोन्ही शोज हाऊसफुल होते. (Panchak Movie)
संबंधित बातम्या –
'१५ ऑगस्ट' नंतर आरएनएम मुव्हिंग पिक्चर्सची पंचक ही दुसरी निर्मिती आहे. '१५ ऑगस्ट' हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.
पाच विशिष्ट नक्षत्रांच्या कालावधीला पंचक म्हटले जाते. यात शुभ किंवा अशुभ घडले की ते पाच पटींनी वाढते. अशीच घटना या चित्रपटात घडते. या घटनेनंतर घरातील प्रत्येक पात्रांचा जो भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक चढउताराचा जो प्रवास होतो, त्याची ही गोष्ट आहे. ही कथा कोकणात घडते. प्रत्येक फ्रेम जेवढी सुंदर, भव्य आणि खोलवर तेवढीच त्यातील पात्रेही साधी, मनाने मोठी आणि मनोरंजक आहेत. ज्या सहजतेने समुद्राचे वादळझेलता येते, तसे मनातली वादळ झेलता येत नाही आणि मग सुरू होते सर्कस. हा सिनेमा प्रासंगिक विनोद आणि ब्लॅक कॉमेडीचे मस्त मिश्रण आहे. थोडक्यात पंचक म्हणजे पाच पट मनोरंजन.
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितले, "' पंचक'चा विचार अत्यंत साधा आहे. साध्या लोकांच्या साध्या भीतीतून आणि साध्या विश्वासातून जी गुंतागुंत निर्माण होते आणि ती सोडवताना पात्रांची जी त्रेधातिरपिट उडते त्याची ही धमाल गोष्ट आहे. माधुरी दीक्षित म्हणतात, "आम्ही या चित्रपटाची संहिता ऐकल्यावर याच्या निर्मितीसाठी अत्यंत उत्सुक होतो आणि त्यासाठी आम्ही उत्कृष्ट कलाकार व तंत्रज्ञ एकत्र आणले. आम्हाला खात्री आहे की, दर्शकांना दर्जेदार कलाकृती अनुभवता येईल. आता आम्हाला चित्रपट दर्शकांना दाखवायची उत्सुकता आहे."
आरएनएम मुव्हिंग पिक्चर्स निर्मित, 'पंचक' हा चित्रपट राहुल आवटे यांनी लिहिला आहे आणि जयंत जठार आणि राहुल आवटे या जोडीने दिग्दर्शित केला आहे.
आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, भारती आचरेकर, विद्याधर जोशी, सतीश आळेकर, सागर तळाशीकर, संपदा जोगळेकर, दिलीप प्रभावलकर, दिप्ति देवी, आणि आशीष कुलकर्णी हे कलाकार चित्रपटात आहेत.