कॅश व्‍हॅनमधून लुटली तब्‍बल सात कोटींची रोकड! पंजाबमधील धक्‍कादायक घटना

कॅश व्‍हॅनमधून लुटली तब्‍बल सात कोटींची रोकड! पंजाबमधील धक्‍कादायक घटना

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंजाबमधील लुधियाना शहरात दरोडेखोरांनी एका खासगी कंपनीच्या कॅश व्‍हॅनमधील सात कोटी रुपयांची रोकड लुटली. या धक्‍कादायक घटनेनंतर संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी करण्‍यात आला आहे. दरम्‍यान, पोलिसांनी दरोडेखोरांनी लुटलेली कॅश व्‍हॅन महामार्गाच्‍या कडेला सापडली. ( Ludhiana Robbery )

सुरक्षा रक्षकांसह कर्मचार्‍यांना ठेवले ओलीस

या घटनेबाबत माहिती देताना पोलिस आयुक्त मनदीप सिंह सिद्धू यांनी सांगितले की, लुधियानाच्या राजगुरु नगरमध्ये एटीएममध्ये पैसे जमा करणाऱ्या सीएमएस या कंपनीतून सुमारे सात कोटी रुपयांची लूट करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास दहा दरोडेखोर कंपनीच्या आवारात घुसले. यातील दोन जणांनी मागच्या मार्गाने कंपनीच्या कार्यालयात प्रवेश करून दरवाजा उघडला. यानंतर अन्‍य दराेडेखाेरांनी कार्यालयात घुसखाेरी केली. तेथे तैनात असलेल्‍या सुरक्षा रक्षकांना आणि तीन कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. यानंतर रोख रक्कम लुटून ते पसार झाले.

तपासादरम्यान पोलिसांना मुल्लानपूर येथील पंडोरी गावात कॅश व्हॅन सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यात दोन शस्त्रेही सापडली आहेत. व्हॅनमध्ये 12 बोअरच्या तीन बंदुकाही सापडल्या आहेत.व्‍हॅनमधील सर्व रोकड लुटून चोरटे पसार झाले. दरोडा टाकण्यापूर्वी घटनास्थळी बसवलेले सीसीटीव्ही बंद करण्‍यात आल्‍याचे प्राथमिक तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

सकाळी सात वाजता ओलिस असलेले कामगार दरवाजा तोडून बाहेर आले आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिस आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सेन्सरची वायर कापली आणि डीव्हीआरही काढून घेतला.

Ludhiana Robbery : सहा महिन्यांपूर्वी कार्यालयाचे स्थलांतर

सहा महिन्यांपूर्वीच कंपनीचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्यात आले होते. या कार्यालयाला दोन दरवाजे आहेत. मागच्या गेटच्या बाजूला मॅरेज पॅलेस आहे, मुख्य गेटसमोर चेंबर्स आहेत. गेटसमोरच बांधकाम सुरू आहे. मोठ्या प्रमणावर रोकड ठेवण्यासाठी हा भाग सुरक्षित नाही, असा इशारा पोलीस मुख्‍यालयाने यापूर्वीच दिला होता. या खासगी कंपनीच्‍या कार्यालयात सुमारे 35 वाहने उभी असून 300 कर्मचारी येथे काम करतात. संपूर्ण यंत्रणा माहीत असलेल्या जुन्या कर्मचाऱ्याचा या दरोड्यात सहभाग असावा, असा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news