पुढारी ऑनलाईन डेस्क : हार्दिक पंड्याची अर्धशतकी खेळी, नूर अहमदची फिरकी आणि मोहित शर्माने शेवटच्या षटकांत केलेल्या कंजूस आणि आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातने लखनौचा ७ धावांनी पराभव केला. सुरुवातीपासूनच एकतर्फी वाटत असलेल्या सामन्यात गुजरातच्या गोलंदाजांनी रंगत आणली. लखनौने जिंकलेला सामना शेवटच्या षटकात गमावला. लखनौकडून कर्णधार के. एल. राहुलने ६१ चेंडूमध्ये ६८ धावांची खेळी केली. मात्र, ही खेळी व्यर्थ ठऱली आहे. हा सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.
लखनौला शेवटच्या षटकात १२ धावांची गरज होती. कर्णधार हार्दिक पंड्याने शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी मोहित शर्मावर सोपवली. मोहित शर्माने पहिल्या चेंडूवर २ धावा दिल्या. यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने के. एल. राहुलला झेलबाद केले. तर तिसऱ्या चेंडूवरही त्याने मार्कस स्टोयनिसला झेलबाद केले. चौथ्या चेंडूवर दीपक हुड्डाने २ धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो १ धावाच काढू शकला आणि धावबाद केला. यानंतर पाचव्या चेंडूवरही २ धावा घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या लखनौच्या फलंदाजांनी १ विकेट गमावली. यानंतर शेवटच्या चेंडूवर लखनौच्या फलंदाजाला एकही धाव काढता आली नाही.
गुजरातने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरातला मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयश आले. गुजरातने लखनौसमोर १३६ धावांचे आव्हान ठेवले. मात्र, लखनौला २० षटकांअखेर १२८ धावाच करता आल्या. गुजरातकडून मोहित शर्मा आणि नूर अमहदने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या. तर राशिद खानने एक विकेट पटकावली.
लखनौचा संघ एकतर्फी विजय मिळवेल असे वाटत असतानाच मोहित शर्माने अंतिम षटकात कमाल केली आणि गुजरातला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सने हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळी आणि वृद्धीमान सहाच्या ४७ धावांच्या जोरावर १३५ धावा केल्या आहेत. गुजरातने लखनौसमोर १३६ धावांचे आव्हान ठेवले आहे.