जानोरी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला ? याबाबतची भूमिका कोल्हापूर, सांगलीचे मतदान झाल्यानंतर ठरविले जाईल. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दिंडोरी मतदार संघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शेतकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी लोकप्रियता आहे. मागील पाच वर्षांमध्ये या मतदारसंघातील कांदा, द्राक्ष ,जिल्हा बँक, अवकाळी पावसाने झालेले नुकसान या विषयावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात सातत्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावरती उतरून आंदोलन केली आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य लोकांच्या बाजूने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. यामुळे स्वाभिमानीला इथे जनतेमध्ये नैतिक असा मोठा पाठिंबा आहे. म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे सुद्धा दिंडोरी मतदार संघामध्ये काही इच्छुक उमेदवार उमेदवारी मागत होते. परंतु मतांचे विभाजन होऊ नये. तसेच संघटनेकडे आर्थिक ताकद नसल्यामुळे येथे उमेदवारी देण्यास संघटनेने नकार दिला.
आता मात्र या मतदारसंघात स्वाभिमानी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सध्या हातकणंगले मतदार संघात सर्व संघटनेचे पदाधिकारी प्रचारात गुंतले आहे. 7 मे ला तेथील मतदान संपल्यावर दिंडोरी मतदार संघामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय होणार आहे.
दिंडोरी मतदार संघातील चित्र हे 5 मे नंतर स्पष्ट होईल. मैदानात कोण कोण असेल याचे स्पष्ट चित्र समोर आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल. आमच्याकडे आत्तापर्यंत अनेकांनी संपर्क करून आम्हाला पाठिंबा द्यावा असे म्हटले आहे. परंतु या मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा हे 7 मे नंतर राजू शेट्टी यांची निवडणूक संपल्यानंतर ठरवले जाईल. भाजपला पाठिंबा देण्याचा आमच्या समोर प्रश्नच नाही. कारण पाच वर्ष आम्हीच त्यांच्याविरुद्ध लढलो आहे. आता महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा .. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की निवडणुकीत अलिप्त रहायचं असे तीन पर्याय आमच्या समोर आहे. त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून 7 मे नंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप यांनी दिली आहे.
हेही वाचा –