Lok Sabha Elections 2024 : ठाण्यासाठी शिंदे-ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला!

Lok Sabha Elections 2024 : ठाण्यासाठी शिंदे-ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला!


ठाणे लोकसभा (Lok Sabha Elections 2024) मतदार संघाचा जागा वाटपचा तिढा सुटलेला असून, ही जागा शिवसेना लढणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे उमेदवार कोण? याबाबत मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी खलबते सुरू असून, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आहे. पक्षाच्या सर्वेक्षणात सरनाईक यांना पसंती अधिक मिळाल्याने इच्छा नसतानाही त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. (Lok Sabha Elections 2024)

ठाणे लोकसभा (Lok Sabha Elections 2024) हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून 1996 पासून या मतदार संघावर भगवा फडकवत राहिलेला आहे. अपवाद 2009 मधील निवडणुकीचा. नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक हे खासदार म्हणून संसदेत दाखल झाले. त्यांनी सेनेचे विजय चौघुले यांचा पराभव केला आणि तो दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता. पराभवाचा हा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने राजन विचारे यांना उमेदवारी दिली आणि 2014 मध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी 2 लाख 81 हजार 299 एवढ्या मोठ्या फरकाने नाईक यांचा पराभव करीत पुन्हा ठाण्याचा बालेकिल्ला ताब्यात मिळविला. आजतागायत हा गड त्यांच्या ताब्यात कायम आहे. त्यावेळी विचारे यांना तब्बल 57.46 टक्के मिळाली. तर 2019 च्या निवडणुकीत खासदार राजन विचारे यांनी विक्रमी चार लाख 12 हजार 145 मतांनी विजय मिळविला होता. विचारे यांना 7 लाख 40 हजार 969 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांना 3 लाख 28 हजार 824 मते पडली होती. भाजपच्या मदतीने विचारे यांना तब्बल 63.45 टक्के एवढी मते मिळाली. आता संजीव नाईक हे भाजपमध्ये, तर आनंद परांजपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत.

ठाणे हा युतीचा बालेकिल्ला असून त्यात चार आमदार भाजपचे, तर दोन आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत. सर्वात जास्त नगरसेवकांची संख्या भाजपची आहे. त्यामुळे ठाण्यावर भाजपने दावा ठोकला आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची साथ न देता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठा कायम ठेवल्याने शिंदे गटाची कोंडी झाली आहे. ही दुखरी नस ओळखून भाजपने ठाण्याची जागा पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 1996 पर्यंत ठाण्यावर भाजपचे कमळ फुलत होते. मात्र, शिवसेना जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी ठाण्याची जागा भाजपकडून खेचून घेतली. दिवंगत राम कापसे हे खासदार असतानाही भाजप नेते प्रमोद महाजन यांनी मतदार संघाच्या अदलाबदलीत ठाण्याची जागा शिवसेनेला सोडली. आनंद दिघे यांनी संघटन कौशल्य पणाला लावून नगरसेवक असलेले प्रकाश परांजपे यांना खासदार बनवून थेट दिल्लीत धाडले आणि ते त्यांच्या निधनापर्यंत खासदार म्हणून राहिले. त्यांच्या पश्चात त्याचे सुपुत्र आनंद परांजपे यांनी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांचा पराभव केला होता. त्यामुळे ठाण्याची जागा सोडण्यास सेना तयार नसून त्याऐवजी पालघरची जागा भाजपला देण्यावर सहमती झाली आहे. ठाणे भाजपला गेले, तर शिवसेना ठाकरे गटाकडून होणारा प्रचार हा आगामी विधानसभा आणि ठाणे महापालिका निवडणुकीसाठी त्रासदायक होईल, अशी भीती सेना नेत्यांना सतावत आहे. तसेच शिंदे गटाचे मतदार हे राजन विचारे यांना मतदान करू शकतात, असाही मतप्रवाह आहे.

ही सर्व राजकीय गणिते लक्षात घेऊन ठाण्याची जागा लढविण्याचा निर्धार करीत आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांना रिंगणात उतरविण्याची रणनीती आखली जात आहे. फाटक यांनी तयारी दर्शविली असून, सरनाईक यांनी पक्ष आदेश आल्यावर निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांना दिल्लीच्या राजकारणात फारसे स्वारस्य नसल्याचे त्यांचे निकटवर्तीय बोलत आहेत. सलग तीनदा विजयी रथ कायम ठेवणार्‍या ओवळा – माजिवडा विधानसभा मतदार संघाबाबत योग्य शब्द मिळाला, तर सरनाईक हे लोकसभेच्या रिंगणात उतरून उबाठा गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्याविरोधात निवडणूक लढतील, अन्यथा फाटकांना उमेदवारी मिळेल. (Lok Sabha Elections 2024)

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news