कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. त्यांनी राज्यांत जाऊन राज्यांच्या उभारणीबाबत, विकासाबाबत मते मांडली. परंतु, सध्याचे पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत. त्यामुळे कितीही वेळा पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर हा महाराष्ट्र संधी मिळाल्यानंतर त्यांना आपला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानामध्ये शिव-शाहू निर्धार सभा आयोजित केली होती. या सभेत ते बोलत होते. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विधानसभेत गद्दारी करणाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीत सूड घेणारच, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
पवार म्हणाले, यापूर्वीचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राज्यांत जात तेव्हा ते राज्यांच्या विकासाबाबत, उभारणीबाबत बोलत असत. पंतप्रधान इंदिरा गांधी अनेकवेळा राज्यांत जायच्या. त्या राज्यांतील गरिबी कशी घालवणार यासंबंधी आपले विचार मांडायच्या. परंतु, आजचे पंतप्रधान देशामध्ये फिरतात, महाराष्ट्रामध्ये येतात. परंतु, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तर त्यांना दोन नावांची प्रकर्षाने अडचण जाणवते. त्यामध्ये एक शरद पवार व दुसरे शिवसेनेचे उद्धव ठाकरे. यामुळे आमच्यावर बोलल्याशिवाय त्यांना राहवत नाही, असेही पवार म्हणाले.
हेही वाचा :