Lok Sabha Election 2024 : विदर्भाच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसची पीछेहाट का झाली?

Lok Sabha Election 2024 : विदर्भाच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसची पीछेहाट का झाली?

विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर देशभर त्यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला असताना 1977 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील बहुसंख्य जागांवर काँग्रेसच विजयी झाली होती. वसंतराव साठे, वसंतराव नाईक, गेव्ह आवारी यांच्यासारखे दिग्गज तेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेसला विदर्भात दिग्गज नेते लाभले. राज्याचे मुख्यमंत्रिपदही मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने विदर्भाला लाभले. या नेत्यांसोबतच नासिकराव तिरपुडे, आबासाहेब खेडकर, श्रीकांत जिचकार यांच्यासारखे दिग्गज नेते तेव्हा विदर्भाला लाभले होते. या नेत्यांमुळे विदर्भात काँग्रेस तेव्हा भक्कम होती. मात्र, नंतर काँग्रेसमधील गटबाजी वाढत गेली. काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा न राहता काही मूठभर नेत्यांचा होऊ लागला. नेत्यांना समाजसेवेपेक्षा स्वतःची संपत्ती वाढविण्यात अधिक रस निर्माण झाला. सामान्यांचे प्रश्न घेऊन काँग्रेसने काम बंद केले. हळूहळू काँग्रेसची जमिनीशी नाळ तुटू लागली. (Lok Sabha Election 2024)

याचवेळेस 1990 नंतर या परिस्थितीत हळूहळू बदल होत गेला. बाबरी मशीद विध्वंस, राम मंदिर यामुळे भाजपची ताकद वाढू लागली. भाजपचे सर्व प्रमुख नेते हे विदर्भातीलच होते. यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही विदर्भात असल्याने भाजपची वाढ होऊ लागली.

भाजपने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा प्रामुख्याने हाती घेतला. काँग्रेसचे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने विदर्भावर कसा अन्याय होतो, याची विविध आकडेवारीसह त्यांनी मांडणी केली. विदर्भातील औद्योगिक प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात पळविण्यात आले, विदर्भातील सिंचन प्रकल्पांना निधी देण्यात टाळाटाळ करण्यात आली, ही बाब त्यांनी वैदर्भीय जनतेला पटवून सांगली. या पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या लॉबीचे नेतृत्व तेव्हा शरद पवार करीत होते. त्यामुळे पवार व काँग्रेस यांच्याविरोधात विदर्भात रोष निर्माण होऊ लागला. 1994 साली शरद पवार हे मुख्यमंत्री असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणासाठी आंदोलन करणारे 100 हून अधिक गोवारी समाजाचे लोक चेंगराचेंगरीत मारले गेले. या घटनेने विदर्भातील जनता काँग्रेसविरोधात मतदान करण्याच्या मन:स्थितीत गेली. विधानसभेत विदर्भात ज्याला बहुमत त्याला राज्याची सत्ता लाभते, हा आजवरचा अनुभव. (Lok Sabha Election 2024)

यामुळेच राज्यात पहिल्यांदा काँग्रेसेतर सरकार 1995 साली शिवसेना-भाजपच्या नेतृत्वात अस्तित्वात आले. कारण या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसला मोठा हादरा बसला होता. या सत्तेचा वापर भाजपने आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी केला. नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस या नेत्यांमुळे भाजपची ताकद वाढत गेली. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर व गडकरी हे केंद्रात मंत्री झाल्यानंतर नागपुरात विविध विकास प्रकल्प आणून भाजपने आपली स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रयत्नांमुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला विदर्भ आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप आपला बालेकिल्ला राखेल की काँग्रेस आपली कामगिरी सुधारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news