शत्रुघ्न सिन्हा-अहलुवालिया यांच्यात काँटे की टक्कर | पुढारी

शत्रुघ्न सिन्हा-अहलुवालिया यांच्यात काँटे की टक्कर

पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदार संघात तृणमूल काँग्रेसचे खासदार व प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना पराभूत करण्यासाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या मतदार संघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला रामराम ठोकून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता. आसनसोल लोकसभेच्या पोटनिवडणुकीत ते विजयी झाले होते. या जागेवर 2019 मध्ये निवडून आलेले भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनीही पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. भाजपमध्ये असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा भाजपच्या रडारवर होते. भाजप सोडल्यानंतर आसनसोलमधून ते तृणमूलच्या तिकिटावर खासदार झाले. शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसतर्फे पुन्हा रिंगणात आहेत. सिन्हा यांना पराभूत करण्यासाठी भाजपने आसनसोलमधून प्रसिद्ध भोजपुरी गायक व अभिनेते पवनसिंह यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, दुसर्‍याच दिवशी पवनसिंह यांनी माघार घेऊन निवडणूक लढण्यास नकार दिला होता. द्विअर्थी भोजपुरी गाण्यांमुळे वादग्रस्त ठरलेले पवनसिंह यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती.

पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथे तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकरण भाजपने लोकसभा निवडणुकीत लावून धरले असताना पवनसिंह यांच्या उमेदवारीवर तृणमूल काँग्रेसने टीका केली होती. त्यामुळे भाजपने आता पवनसिंह यांची उमेदवारी बदलवून शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात माजी केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांना मैदानात उतरवले आहे. अहलुवालिया हे सध्या पश्चिम बंगालच्याच वर्धमान-दुर्गापूर येथील खासदार आहेत. गेली 30 वर्षे ते राजकारणात आहेत. केंद्रात मंत्रीही राहिले आहेत.

आसनसोलमध्ये चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात अहलुवालिया यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आसनसोलमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे.

Back to top button