नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभेचे मतदान शेवटच्या पाचव्या टप्प्यात होणार असले तरी, त्याबाबतची प्रक्रिया अवघ्या चार दिवसांनी (दि. २६) सुरू होणार आहे. मात्र, अशातही महायुतीचा उमेदवार घोषित केला जात नसल्याने, भाजप-सेनेत धुसफुस वाढली आहे. विशेष म्हणजे तिकिटाच्या रेसमध्ये अग्रस्थानी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर माघार घेतल्यानंतरही उमेदवारीचा पेच कायम असल्याने महायुतीतील 'कोल्ड वॉर' आता धुमसायला लागला आहे.
महायुतीतील काही वादग्रस्त जागांवर तोडगा काढण्यात तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते यशस्वी ठरले असले तरी, नाशिक लोकसभा मतदारसंघ त्यास अपवाद ठरताना दिसून येत आहे. या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच तिन्ही पक्षांनी दावा केल्याने, उमेदवारीचा पेच वाढत गेला. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले गेल्याने, भाजपसह सेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून आले. भाजपच्या शिष्टमंडळाने थेट भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, या मतदारसंघातील भाजपची ताकद कागदावर दाखवून दिली.
दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर एकदा नव्हे तर दोनदा शक्तिप्रदर्शन केले. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंंदे यांची तब्बल ११ वेळा भेट घेत उमेदवारी मागितली. मात्र, याचदरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव पुढे आल्याने, उमेदवारीवरून सेनेतच रस्सीखेच असल्याचे चित्र निर्माण झाले. या सर्व घडामोडी घडत असताना, मंत्री भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आपण उमेदवारीच्या रेसमधून माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने नाशिकच्या जागेचा तिढा सुटेल, असे काहीसे वाटत होते. मात्र, आता उमेदवारीवरून भाजप-सेनेत धुसफुस वाढल्याने नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार, असा प्रश्न नाशिककरांना सतावत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीने निवडणूक जाहीर झाल्याच्या काही दिवसांतच उमेदवार घोषित करून प्रचारात आघाडी घेतल्याने, महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या भाैगोलिक कक्षा लक्षात घेता, कमी दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचे महायुतीच्या उमेदवारासमोर आव्हान असेल.
जागा भाजपलाच सोडावी : दिनकर पाटील
नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. तीन आमदार, महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक, त्र्यंबक नगरपालिकेत सत्ता, मतदारसंघाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत असलेले संघटन, भाजपला मानणारा वर्ग या सर्व जमेच्या बाजू असल्याने, भाजप कोअर कमिटीचे सदस्य, सर्व मंडल अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला महायुतीत नाशिकची जागा भाजपला सोडविण्याची मागणी केली आहे. कोणत्याही अवास्तव गोष्टींचा विचार न करता अभ्यासपूर्वक आणि पक्षाकडून झालेल्या सर्वेक्षणांच्या आधारे नाशिक लाकेसभेत फक्त भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो, ही वस्तुस्थिती वेळोवेळी पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचविली आहे. त्यामुळे ही जागा भाजपलाच सोडावी, अशी मागणी भाजपकडून इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांनी पत्राद्वारे पुन्हा एकदा केली आहे. तसेच सहा विधानसभा क्षेत्र असलेल्या या मतदारसंघांत पुढील २०-२५ दिवसांत प्रचार करणे अवघड असल्याने, याबाबतचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी अपेक्षाही दिनकर पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आज निर्णय शक्य
मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर, नाशिकच्या जागेवर शिवसेनेने आपला दावा आणखी भक्कम केला आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. दुसरीकडे भाजपचे स्थानिक पदाधिकारी अजूनही नाशिकच्या जागेबाबत अपेक्षा ठेवून आहेत. अशात नाशिकच्या जागेचा सोमवारी (दि.२२) निर्णय होण्याची शक्यता आहे. भुजबळांनी माघार घेतल्याच्या काही वेळातच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी दोन ते तीन दिवसांत याबाबतचा निर्णय होईल, असे स्पष्ट केले होते.
हेही वाचा :