जोतिबा डोंगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध— प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात आदी राज्यांतून भाविक कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा दर्शनासाठी डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. दरम्यान, मानाच्या सर्व सासनकाठ्या सोमवारी डोंगरावर दाखल होणार आहेत.
प्लास्टिकमुक्त यात्रा, भेसळयुक्त गुलाल, पेढे व इतर खाद्यपदार्थांची तपासणी, पार्किंग, अन्नछत्र, दर्शनरांग व्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्य, स्वच्छता, लाईव्ह दर्शन व्यवस्थेची कामे पूर्ण झाली आहेत. रविवारी प्रशासनाची नियोजनाबद्दल रंगीत तालीम झाली. भाविकांनी दर्शनासाठी रविवारी गर्दी केली होती. पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे खुले झाल्यानंतर मोठ्या रांगा लागल्या. दिवसभरात अनेक भाविक सासनकाठी घेऊन वाद्यांच्या तालावर नाचत, 'चांगभलं'चा गजर दाखल झाले. रविवारी संध्याकाळी पालखी सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. मानाच्या सर्व सासनकाठ्या सोमवारी दुपारपर्यंत दाखल होणार असून सायंकाळी पालखी सोहळ्यासाठी मंदिरात येणार आहेत.
देवस्थान समितीने चैत्र यात्रेसाठी सासनकाठीधारकांना स्वतंत्र वाहनतळ तयार केले आहे. त्यात पाण्यासह इतर सुविधा आहेत. आरोग्य, पाणी, स्वच्छता सेवा पुरवण्यात येत आहेत. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी यात्रेदिवशी विविध ठिकाणी लावलेल्या स्क्रीनद्वारे श्री जोतिबा देवाचे लाईव्ह दर्शन होणार आहे. प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेच्याद़ृष्टीने नियोजन केले आहे. यात्राकाळात वीज खंडित झाल्यास मोठ्या जनरेटर्सची सोय केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, बॉम्ब शोध व नाशक पथक, अग्निशमन दलाची व्यवस्था केली आहे
पोलिस अधीक्षक डॉ. महेंद्र पंडित मांनी अन्य जिल्ह्यातून बंदोबस्त मागवला आहे पोलिस अधीक्षक 1, अपर अधीक्षक 2, उपअधीक्षक 6. निरीक्षक 27, उपनिरीक्षक 90, महिला पोलिस, वाहतूक पोलिस, शीघ— कृती दत्त, आरसीपी, होमगार्ड, एसआरपी असे दोन हजारांवर पोलिस, वाहतूक पोलिस तैनात असणार आहेत.