कुडाळ : पुढारी वृत्तसेवा कुडाळ एसटी आगाराच्या कुसगाव तिवरवाडी हिंडेवाडी मार्गे कुडाळ एसटी बसचा आज (बुधवार) सकाळी डिगस सुर्वेवाडी येथील तीव्र उतारावर भीषण अपघात टळला. प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बस तेथील चढावावर आली असता, बसचे गिअर पडणे बंद झाले, अन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. कसेबसे नियंत्रण मिळविण्यात चालकाने यश मिळवले, मात्र उतारावरून बस मागे रिव्हर्स जाताना रस्त्याच्या खाली उतरली, परंतू चालकाने ब्रेक लावला अन्यथा बस रस्त्यालगतच्या सखल भागात उतरून पुढे शेतात उलटी गेली असती. या बसमधून शालेय मुलांसह प्रवाशी मिळून सुमारे 45 ते 55 प्रवाशी प्रवास करत करत होते. यावेळी प्रवाशांमध्ये घबराट उडाली. प्रवाशांचा भितीने थरकाप उडाल्याने एकच आरडाओरडा झाला. हि घटना बुधवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की, कुडाळ एसटी आगाराची कुसगाव तिवरवाडी हिर्लोक मार्गे कुडाळला जाणारी वस्तीची बसफेरी बुधवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास तिवरवाडी येथून हिर्लोक मार्गे कुडाळला जाण्यास निघाली. परंतू डिगस सुर्वेवाडी येथील तीव्र चढावावर बस उलटी मागे आली. अचानक बसचा गिअर लॉक झाला. त्यामुळे चढावावरून बस पुढे न जाता, मागे रिव्हर्स जाऊ लागली. चालकाचे बसवर नियंत्रण मिळत नसल्याचे लक्षात येताच प्रवाशी व शालेय मुलांची भितीने गाळण उडाली. कसेबसे चालकाने बसवर नियंत्रण मिळवत रस्त्यावरच बस ब्रेक करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही बसचे मागचे टायर रस्त्याच्या खाली उतरले. तसेच बस रस्त्यावर पूर्णपणे आडवी उभी राहीली. त्यामुळे रस्ताही पूर्णपणे बंद झाला. जर वेळीच चालकाने ब्रेक लावला नसता तर ती तशीच मागे जाऊन सखल भागात उतरून थेट शेतात जाऊन मोठा अपघात झाला असता. परंतू सुदैवाने हा अनर्थ टळला.
या बसमधून पणदूर महाविद्यालयात तसेच क्लाससाठी जाणारी शालेय मुले दररोज प्रवास करीत असतात. त्यामुळे बसमधून मोठ्या प्रमाणात शालेय मुले प्रवास करत होती. त्याचबरोबर आज बुधवार कुडाळचा आठवडा बाजार असल्याने नागरिक बाजारासाठी बसमधून प्रवास करत होते. शालेय मुलांसह सुमारे 50 हून अधिक प्रवाशी या बसमधून प्रवास करत होते. गर्दी झाल्याने काही मुले उभे राहून प्रवास करत होती. या प्रवाशांमध्ये भीतीने थरकाप उडाला.
प्रवाशी सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर शालेय मुलांसह ब-याच प्रवाशांनी अडीच किलोमीटर चालत जात पणदूर गाठले. चालक व वाहकाने कुडाळ एसटी आगाराला याबाबत माहिती दिली. काही वेळातच या मार्गावरून धावणा-या कुडाळ – हिंदेवाडी एसटी बस येथे आली असता, त्या बसच्या चालकाने सुखरूपपणे ती बस चढावावरून पुढे नेऊन दिली. दरम्यान कुडाळ एसटी आगाराच्या अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा :