कोल्हापूर : वारणा नदीचा पूर ओसरला; शित्तुर-आरळा, सोंडोली-चरण पूल वाहतुकीसाठी खुले

कोल्हापूर : वारणा नदीचा पूर ओसरला; शित्तुर-आरळा, सोंडोली-चरण पूल वाहतुकीसाठी खुले

शित्तूर-वारुण; पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरणक्षेत्रात पडणार्‍या मुसळधार पावसाचा जोर ओसरल्याने धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी गेल्या पाच दिवसांपासुन पुराच्या पाण्याखाली गेलेले शित्तुर-आरळा, सोंडोली-चरण हे पूल वाहतुकीसाठी पूर्णतः खुले झाले आहेत. यामुळे नदीकाठचे विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले आहे.

वारणेस आलेल्या पुरामुळे शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील उखळू, शित्तूर-वारूण, शिराळे-वारूण, खेडे, सोंडोली, मालेवाडी, जांबुर, मालगाव, कांडवण आदी गावांचा व येथील वाड्यावस्त्यांचा शिराळा तालुक्याशी व येथील बाजारापेठांशी संपर्क तुटला होता. तो आता पूर्ववत सुरू झाला आहे. पुराचे पाणी कमी झाल्याने नदीकाठच्या शेकडो एकर शेतीतील ऊस व भात पिकांनी आज मोकळा श्वास घेतला आहे.

चांदोली धरणाच्या सांडव्यातून ३ हजार ९११ क्युसेक तर विद्युत गृहातून १५९३ क्युसेक असा एकूण ५ हजार ५०४ क्यूसेक विसर्ग सध्या वारणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. चांदोली धरण क्षेत्रात गेल्या ६ दिवसांपासून अतिवृष्टी सुरू होती. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने धरणातून ९ हजार ३७३ कुसेकपर्यंत विसर्ग सुरु ठेवला होता.

दरम्यान, आजवर चांदोली धरण क्षेत्रात पडणार्‍या पावसाने २१०० मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. गेल्या चोवीस तासात २६ मिलिमीटर तर आजअखेर २१५६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. धरणात सध्या ३१५२ क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. आज सकाळी धरणात ८७४.७०७ द.ल.घ.मी म्हणजेच धरणात सध्या ३०.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणीपातळी ६२३.७५ मीटरवर पोहोचली असून धरण सध्या ८९.७९ टक्के भरले आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news