ठाणे ; दिलीप शिंदे : स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात लाखो क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांनी आहुती दिली. संसारावर नांगर फिरले, बलिदान दिले. अखेर 15 ऑगस्टला भारतात स्वातंत्र्याची सोनेरी पहाट झाली. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत आहे. स्वातंत्र्याची
ही अनुभूती ठाण्यातील तीन स्वातंत्र्यसैनिक हे याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. त्यापैकी एक भाग्यवान आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ राजदत्त (मुंबई), दुसरे मोतीलाल शंकर धोंगडे (टिटवाळा) आणि चंद्रकांत गंगाराम पाटील (उल्हासनगर) आणि पालघर जिल्ह्यातील रवींद्र दत्तात्रय वैद्य ऊर्फ भाई वैद्य हे होय.
या स्वातंत्र्यसैनिकांनी भारत स्वातंत्र्य संग्राम आणि गोवामुक्ती संग्रामात कारागृह भोगले होते आणि हे आता अमृत महोत्सवाचे साक्षीदार असतील. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. या स्वातंत्र्य संग्रामात अखंड ठाणे जिल्ह्यातील सुमारे 783 स्वातंत्र्यसैनिकांनी कारावास भोगला होता, अशी अधिकृत नोंद आहे. नोंद नसलेल्या स्वातंत्र्यसेनानींची संख्या असंख्य आहे. 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन ठाणे आणि पालघर अशा दोन स्वतंत्र जिल्ह्यांची निर्मिती झाली. आदिवासी जिल्हा म्हणून पालघरची घोषणा झाली. अशा या नव्या जिल्ह्यात सुमारे 600 स्वतंत्र संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामामध्ये सहभाग घेतलेले स्वातंत्र्यसैनिक होते. तर ठाणे जिल्ह्यात 183 स्वतंत्र्यसैनिकांची अधिकृत नोंद आहे.
ठाणे जिल्ह्यातील 183 पैकी तीन स्वातंत्र्यसैनिकांना आझादीच्या अमृतमहोत्सवाचे साक्षीदार बनण्याचे भाग्य लाभले आहे. दुर्दैवाने डोंबिवलीतील स्वातंत्र्यसैनिक श्रीकृष्ण शामराव ओक यांना ४ ऑगस्ट रोजी देवाज्ञा झाली. जिल्ह्यातील २२ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्य सरकारची पेन्शन सुरू आहे. जव्हारमधील भाई वैद्य हे अमृत महोत्सवात सहभागी होणार आहेत.
सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. लाठीचार्ज झाला होता. आम्ही जखमी झालो होतो. त्यावेळी 15 दिवस कारावास भोगावा लागला. जुन्या आठवणी आजही ताज्या आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना खूप आनंद वाटत आहे.
चंद्रकांत पाटील स्वातंत्र्यसैनिक ( सध्या वास्तव्य धुळे)