scholarship : कोल्हापूर जिल्ह्याचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात डंका

scholarship : कोल्हापूर जिल्ह्याचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात डंका
Published on
Updated on

सरुड : चंद्रकांत मुदूगडे

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या गेलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती (scholarship) परीक्षांचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या संकेतस्थळावर नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. यामध्ये परंपरेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याने अनुक्रमे २९.१४ टक्के व २५.१२ टक्के यश मिळवून राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती- २९.१४ टक्के निकाल 

१२ ऑगस्ट, २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुंबई वगळता राज्यात नाव नोंदणी केलेल्या एकूण ३ लाख ८८ हजार ५१५ विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्षात ३ लाख ३७ हजार ३७० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २० हजार २५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यापैकी ५ हजार ८३६ पात्र परीक्षार्थी आहेत. यातील ५९१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. राज्याचा शेकडा निकाल १६.९४४ टक्के तर कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल २९.१४ टक्के लागला आहे. या निकालामध्ये औरंगाबाद (२५.४४), बुलढाणा (२४.६१), सिंधुदुर्ग (२१.४१), ठाणे (२१.०२) पुणे (२०.४५) तर  सर्वात कमी गडचिरोली (६.५३) निकालाची नोंद झाली आहे.

पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती- २५.१२ टक्के निकाल 

पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मुंबई वगळता राज्यात नाव नोंदणी केलेल्या एकूण २ लाख ४४ हजार ३१४ विद्यार्थ्यांपैकी २ लाख १० हजार ३३८ विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११ हजार ४२६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात २ हजार ८७० पात्र परीक्षार्थी ठरले. तर ५७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. येथे राज्याचा शेकडा निकाल ११.३९ टक्के तर कोल्हापूर जिल्ह्याचा २५.१२ टक्के निकाल लागला आहे. पाठोपाठ सिंधुदुर्ग (२०.८०), पुणे (१९.४६), ठाणे (१७.४३), सोलापूर (१६.२८), रत्नागिरी (१५.३४) तर सर्वात कमी गडचिरोली (१.७६) निकालाचा क्रम लागला आहे.

scholarship : जिल्ह्यात भुदरगड, कागल, राधानगरी अव्वलस्थानी

दरम्यान पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) व पूर्व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालात कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार १६२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा बहुमान मिळाला आहे. यात भुदरगड (१७७), कागल (१२९), राधानगरी (११५) (८ वी शिष्यवृत्तीत राधानगरी प्रथम क्रमांकावर आहे.) अनुक्रमे अव्वलस्थान पटकावले आहे. एकूण जिल्ह्याच्या गुणवत्तेत या तिन्ही तालुक्यांनी ३६.२३ टक्के वाटा उचलून वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.

शिष्यवृत्ती प्राप्त तालुकानिहाय विद्यार्थी :

तालुका –  ५ वी शिष्यवृत्ती –  ८ वी शिष्यवृत्ती

भुदरगड      १०३,            –   ७३   (१७७)

कागल         ८६,            –   ४३   (१२९)

राधानगरी     ३९,            –   ७६   (११५)

आजरा         ४४,            –   ५५   (९९)

करवीर         ४२,            –    ३१   (७३)

शिरोळ         २८,            –    २९   (५७)

चंदगड         १९,            –    ३७   (५६)

गडहिंग्लज    २८,            –    २६   (५४)

हातकणंगले   २०,           –    ३१   (५१)

शाहूवाडी         ६,          –    २४   (३०)

पन्हाळा            ९,         –     २०  (२९)

गगनबावडा       १,         –      ४   (०५)

कोल्हापूर मनपा-११७      –      ६९  (१८६)

इचलकरंजी मनपा-४९     –      ५२  (१०१)

scholarship शिष्यवृत्ती रक्कमेत परीक्षा परिषदेची कुचराई

राज्य सरकार परीक्षा परिषदे मार्फत आजघडीला प्रति विद्यार्थी महिना १०० याप्रमाणे १० महिन्यांचे १ हजार रुपये शिष्यवृत्ती देते. यातून विद्यार्थ्यांनी पूर्व तयारीसाठी केलेला खर्चही भागत नाही, तुलनेत केंद्र सरकार मार्फत एनएमएमएस शिष्यवृत्ती प्राप्त प्रति विद्यार्थी वर्षाला १२ हजार रुपये मिळतात. या दोन शिष्यवृत्ती रकमेत मोठ्या प्रमाणात तफावत आहे. राज्य परीक्षा परिषद परीक्षेला बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची 'शास्त्रोक्त' कमाई करते. अशावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात कुचराई का केली जाते, असा प्रश्न पालक, शिक्षक, शिक्षक संघटना या संबंधित घटकांकडून उपस्थित केला जात आहे.

पाहा व्हिडिओ: दिल ये जिद्दी है म्हणत ऐश्वर्याची विजयी घोडदौड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news