महापालिकेचे निवृत्त कर्मचारी दिलीप शंकर जानवेकर यांचा सुभाषनगर सिरत मोहल्यानजीक असलेला बंगला फोडून चोरट्यांनी दहा तोळ्याचे दागिने रोकड व अन्य साहित्य लंपास केले. शुक्रवारी पहाटे ही घरफोडीची घटना घडली. चोरट्याने दरवाजाचा कडीकोयंडा कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परमेश्वर ओमासे सहाय्यक निरीक्षक भगवान शिंदे यांच्यासह डीबी पथके आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्वान पथक पाचारण करण्यात आले, मात्र ते परिसरातच घुटमळले. चोरटे या परिसरातील माहितगार असावेत असे ओमासे यांनी सांगितले.
दिलीप जानवेकर हे निवृत्त झाल्यानंतर कुटुंबीयांसमवेत सावंतवाडी येथील मुलाकडे वास्तव्यास आहेत. दिवाळी निमित्ताने जानवेकर कुटुंब नुकतेच कोल्हापूर येथील आपल्या बंगल्यात वास्तव्यास आले आहेत. आज (शुक्रवार) पहाटे जानवेकर मॉर्निंग वाकसाठी घरातून बाहेर पडले होते, तर त्यांचे अन्य कुटुंबीय बंगल्यात दुसऱ्या मजल्यावर झोपले होते.
चोरट्यांनी संधी साधून मुख्य दरवाजावरील कडी-कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील दहा तोळ्याचे दागिने आणि रोकडे असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दिवाळीच्या तोंडावर घरफोडी झाल्याने सुभाषनगर परिसरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे कैद झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.