Kirit Somaiya : किरीट सोमय्या आज कोल्हापुरात

Kirit Somaiya : किरीट सोमय्या आज कोल्हापुरात

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : भाजपचे नेते किरीट सोमय्या आज (दि. २३) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला भेट देणार असल्यामुळे बुधवारी जिल्हा बँकेमध्ये अधिकारी, संचालक यांची दिवसभर खलबते सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांची भेट घेऊन चर्चा केली. ( Kirit Somaiya)

जिल्हा बँकेवर ईडीने छापा टाकल्यानंतर सोमय्या पुन्हा आज (दि.२३) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सकाळी विभागीय सहनिबंधकांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर जिल्हा बँकेस भेट देणार आहे. दुपारी त्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठक झाल्यानंतर दुपारी समरजितसिंह घाटगे यांच्या निवासस्थानी भोजन घेऊन पुण्याला रवाना होणार आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेत आज दिवसभर अधिकारी, पदाधिकारी, संचालक यांच्यामध्ये चर्चा सुरू होत्या. यामध्ये सोमय्या जी माहिती मागतील ती देण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पथक जिल्हा बँकेत आले आहे. त्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांची भेट घेतली. बँकेच्या आवारात गर्दी न करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना द्याव्यात, अशा सूचना पोलिसांनी दिल्याचे समजते.

दरम्यान प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर बँकेने गेल्या आठ वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेच्या संचालक मंडळात विविध पक्षांचे प्रतिनिधी आहेत. सर्व संचालक मंडळ एकमताने आणि अतिशय विश्वासाने काम करीत आहोत. सध्या बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असून दि. ३१ डिसेंबर २०२२ अखेर बँकेला १०५ कोटी नफा झाला असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Kirit Somaiya : आ. मुश्रीफ यांचे शांततेचे आवाहन

किरीट सोमय्या यांचे जिल्हा बँकेमध्ये स्वागतच आहे. त्यांना आवश्यक असणारी माहिती बँकेचे प्रशासन देईलच. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. बँकेत या आणि जी माहिती हवी असेल ती घ्या, असे सोमय्या यांना आपण यापूर्वीच आवाहन केले आहे. कदाचित त्यानुसार ते येत असावेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news