पुणे : खडकवासला धरणसाखळीत 15 ऑक्टोबरला 23 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता असून, गेल्या आठ वर्षांच्या तुलनेत हा सर्वांत कमी पाणीसाठा असेल. शहराला पुढील वर्षी 15 जुलैपर्यंत पिण्यासाठी 15.56 टीएमसी पाणी लागेल. बाष्पीभवनाद्वारे जाणारे 2.72 टीएमसी पाणी वजा जाता सिंचनासाठी पाच टीएमसी पाणी उपलब्ध राहील. रब्बी हंगामाच्या पहिल्या आवर्तनाला ते पाणी वापरल्यानंतर उन्हाळी हंगामातील सिंचनाला पाणी उपलब्ध होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
जुलै आणि ऑगस्टमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी राहिले. सप्टेंबरमध्येही आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला. पावसाळ्याचा एकच महिना शिल्लक राहिला आहे. त्यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडल्यास धरणांच्या जलाशयातील साठा वाढेल. 15 ऑक्टोबरला धरणसाखळीतील पाणीसाठा विचारात घेऊन पुढील वर्षाचे पाणी वाटपाचे नियोजन केले जाते. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी किती पाणी राखून ठेवायचे याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होईल.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक दोन सप्टेंबरला झाली. तेव्हा 15 ऑक्टोबरपर्यंत खरीप हंगामासाठी पाणी देण्याचे तसेच पुण्याला नेहमीप्रमाणे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 ऑक्टोबरपर्यंत 17.16 टीएमसी पाणी शिल्लक राहील, असे जलसंपदा विभागाने या बैठकीत निदर्शनास आणून दिले होते. खडकवासला धरणसाखळीत 31 ऑगस्टला 27.60 टीएमसी पाणीसाठा होता. तो आज (13 सप्टेंबर) सायंकाळी 27.41 टीएमसी झाला आहे. खरीप हंगामातील सिंचनासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत 2.75 टीएमसी पाणी लागेल, तर पुढील 33 दिवसांत पुणे शहराला 1.88 टीएमसी पाणी लागेल. त्यामुळे आजचा साठा विचारात घेतल्यास, धरणांत 22.78 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहील.
ऑक्टोबरमध्ये नवरात्रोत्सव आणि नोव्हेंबरमध्ये दिवाळी असल्याने सणासुदीच्या काळात पाणी वाटपाबाबत कठोर निर्णय घेण्याचे टाळले जाते. मात्र, पुढील महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास, कमी पाणीसाठा लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. खरीप हंगामाला 27 जुलैपासून पाणी देण्यास सुरुवात झाली. 15 ऑक्टोबरपर्यंत 81 दिवसांत 7.62 टीएमसी पाणी वापरले जाणार आहे. जनाई सिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी 1.47 टीएमसी पाणी लागणार आहे.
त्याबरोबर दौंड आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी द्यावे लागणार आहे. पुणे शहराला रोज पिण्यासाठी जलवाहिनीतून 1460 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरविले जाते. दरमहा दीड टीएमसी पाणी पुण्याला पुरविले जाते. गेल्या पाच वर्षांत पुणे शहराचा पाणीवापर सरासरी वीस टीएमसीच्या आसपास आहे.
शेतीला खरीप हंगामाच्या सिंचनासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत पाणी देण्यात येणार आहे. लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकर्यांची पाण्यासाठी मागणी आहे. पाऊस कमी असल्याने धरणात यंदा पाणीसाठा दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. 15 ऑक्टोबरचा पाणीसाठा विचारात घेऊन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुढील पाणी वाटपाचा निर्णय घेण्यात येईल.
– सुनंदा जगताप, अधीक्षक अभियंता, जलसंपदा
धरणांतील 15 ऑक्टोबरचा पाणीसाठा (टीएमसी)
2015- 16.17
2016- 28.02
2017- 27.45
2018- 25.38
2019- 28.15
2020- 29.03
2021- 28.68
2022- 29.08
2023- 22.78
हेही वाचा