इंडिया आघाडीची ऑक्टोबरमधील संयुक्त सभा भोपाळमध्ये

इंडिया आघाडीची ऑक्टोबरमधील संयुक्त सभा भोपाळमध्ये

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विरोधकांच्या इंडिया आघाडीने पुढील महिन्यात भोपाळ येथे संयुक्त सभा घेण्याची घोषणा केली आहे. मध्यप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या या संयुक्त सभेतून राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आज ठरविली. लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येणाऱ्या इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाची प्रक्रिया करण्याचेही आज ठरले.

आज (दि. १३) इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. तृणमूल कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अपवाद वगळता समन्वय समितीचे १२ सदस्य यात सहभागी झाले होते. यामध्ये के. सी. वेणुगोपाल (कॉंग्रेस), टी. आर. बालू (द्रमुक), राघव चड्डा (आप), संजय राऊत (शिवसेना – ठाकरे गट), डी. राजा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), मेहबुबा मुफ्ती (पीडीपी), ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स) आदी नेत्यांचा समावेश होता.  दोनतासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीनंतर सर्व नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये संयुक्त निवेदन वाचून दाखविण्यात आले. भाजप आणि आणि पंतप्रधानांच्या सूडाच्या राजकारणातून सक्तवसुली संचलनालयातर्फे सुरू असलेल्या कारवाईमुळे समितीचे सदस्य असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, असे कॉंग्रेस नेते वेणुगोपाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

समन्वय समितीने जागावाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आघाडीत पक्ष यावर चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेतील. तर देशाच्या विविध भागांमध्ये इंडिया आघाडीतर्फे संयुक्त जाहीर सभा घेण्याचे समन्वय समितीने ठरविले असून यातील पहिली सभा भोपाळ येथे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. यात वाढत्या किमती, बेरोजगारी, भाजप सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यावर भाजपला घेरण्याचे समन्वय समितीच्या बैठकीत ठरले.

जात जनगणनेवर इंडिया आक्रमक

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत जात जनगणनेच्या मुद्द्यावर तसेच संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनावरही बातचित झाली. जातनिहाय जनगणनेचा विषय सर्व विरोधकांनी आक्रमकपणे लावून धरण्याचा निर्धार आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याखेरीज, काही वृत्तवाहिन्यांच्या निवेदकांच्या (अँकर) कार्यक्रमामध्ये इंडिया आघाडी सहभागी होणार नसल्याचे ठरले. विरोधकांच्या संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे,की ज्यांच्या कार्यक्रमामध्ये इंडिया आघाडीतील एकही पक्ष सहभागी होणार नाही. या अँकरची नावे निश्चित करण्याची जबाबदारी समन्वय समितीने उपगटाकडे सोपविली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news