Contractor Santosh Patil’s death case : कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी दिला राजीनामा

Contractor Santosh Patil’s death case : कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी दिला राजीनामा

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी (Contractor Santosh Patil's death case) कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायतराजमंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांनी शुक्रवारी (दि.१५) सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांना व पक्ष कार्यकर्त्यांना म्हणाले की, माझ्याविरुद्ध हे कटकारस्थान रचले जात आहे. यातून मी सुखरुप बाहेर पडेन. मी स्वत:चे निर्दोषत्त्व सिद्ध करुन पुन्हा मंत्री होईन असे ही ते म्हणाले.

कंत्राटदार संतोष पाटील (Contractor Santosh Patil's death case) आत्महत्याप्रकरणी काँग्रेसने राज्यभर ईश्‍वरप्पांविरुद्ध आंदोलन छेडले आहे. ईश्‍वरप्पा यांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतल्याने विरोधक आक्रमक झाले होते. भाजपच्या पक्षश्रेष्टींनी याप्रकरणी कठोर भूमिका घेतल्यावर गुरुवारी आपण राजीनामा देणार असल्याचे के.एस. ईश्वरप्पा यांनी म्हंटले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी त्यानी आपला राजीनामा मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडे सुपुर्द केला.

यावेळी के.एस.ईश्वरप्पा म्हणाले, मला जाणून बुजून या प्रकरणी गोवण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मी मंत्रीपदी असल्यावर या चौकशीवर परिणाम होईल असे विरोधकांना वाटेल. त्यामुळे मी मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या प्रकरणातून मी निश्चित निर्दोषमुक्त होईन त्यावेळी मी पुन्हा मंत्रीपदी विराजमान होईन असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.

बोम्मई सरकारचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर संतोष पाटील या कंत्राटदाराने 'कमिशन' मागितल्याचा आरोप केला होता. पाटील यांनी मंगळवारी आत्महत्या केली. उडुपी येथील एका खाजगी लॉजच्या खोलीत संतोष पाटील यांचा मृतदेह आढळून आला. या कंत्राटदाराने एका व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या मेसेजमध्ये त्यांनी ईश्वरप्पा आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

काँग्रेसच्या कार्यकाळात डीएसपी गणपती यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांनी राजीनामा दिला होता. त्याच न्यायाने संतोष पाटील यांनी मंत्र्यांवर थेट कमिशनचा आरोप केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरण (Contractor Santosh Patil's death case) सीबीआय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे सोपवावे. संतोष यांच्या कुटुंबीयांना २ कोटींची नुकसान भरपाई द्यावी. शिवाय त्यांनी केलेल्या कामाचे सर्व बिल देण्याची मागणी राज्य कंत्राटदार संघाचे अध्यक्ष केंपण्णा यांनी सरकारकडे केली आहे. ते म्हणाले, निविदेसाठी ५ टक्के कमिशनची मागणी केली जाते. आरोग्य खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे. पाटबंधारे खात्यामध्येही लाच मागितली जाते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आतापर्यंत चारवेळा तक्रार केली आहे. पण, काहीच उपयोग झाला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news