राजकीय ‘चालीसा’ सुरु ! रवी राणांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेकडूनही जाहीर आव्हान | पुढारी

राजकीय 'चालीसा' सुरु ! रवी राणांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेकडूनही जाहीर आव्हान

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मस्जिदीवरील भोंगे हटविण्याबाबत इशारा दिला आहे. याच मुद्यावरून अमरावती शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसाचे पठन करावे. अन्यथा हनुमान जयंतीनंतर खासदार नवनीत राणा यांच्यासह मातोश्रीवर पोहोचत हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला आहे. यावर पलटवार करीत महानगर शिवसेनेने आमदार रवी राणा यांच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा देत आमदार रवी राणा यांना ललकारले आहे.

आमदार रवी राणा : मातोश्रीवर वाचणार चालिसा

आमदार रवी राणा यांनी शुक्रवार, १६ एप्रिलला एका व्हिडीओद्वारे हनुमान जयंतीला सकाळी ९ ते ११ पर्यंत अकोली रोड वरील खंडेलवाल नगर स्थित पगडीवाले हनुमान मंदिरात आपल्या हाताने भोंगा चढविणार असल्याचे सांगितले. भोंगे नसलेल्या हनुमान मंदिरात भोंगे लावणार असल्याचे आमदार राणा म्हणाले.

खासदार नवनीत राणा यांच्यासह भोंग्यावर हनुमान चालिसा पठन करणार आहे. राम मंदिरात सुंदरकांड झाले पाहिजे म्हणून भोंगे वाटप करणार आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जागृत केले पाहिजे.

हनुमान जयंतीच्या पर्वावर हनुमान चालिसा वाचत नसेल तर त्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. ते विचार जागृत करण्यासाठी हनुमान जयंतीनंतर खासदार नवनीत राणा आणि स्वत: मातोश्रीवर जात हनुमान चालिसा पठन करणार असल्याचा इशारा आमदार राणा यांनी दिला.

मातोश्रीवर जाल तर हनुमानजी करू –पराग गुडधे

आमदार राणा यांना चोख प्रत्युत्तर देत शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी राणांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचे एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. भाजपाच्या पोसनीचे असलेले आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मातोश्री समोर हनुमान चालिका वाचेल, असा इशारा दिला. मातोश्री हे शिवसैनिकांकरिता एक मंदिर आहे. काही जण पाठवून बेशरमचे झाड लावण्यासाठी ते काही भाजपाच्या आमदाराचे घर नाही.

मातोश्रीवर जाल तर हनुमानजी केल्या शिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. मातोश्री बाहेर कधी काळी दिवाळी साजरी करणार होते, कधी दिसले नाही. आंदोलन करणार होते, कधी दिसले नाही, केवळ बताल्या गोष्टी करीत भ्रमीत करायचे. हनुमान जयंतीचा दिवस तुमचा, रविवारी १२ वाजेपर्यंत मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा वाचून दाखवा, अन्यथा राणा निवासाबाहेर रविवारी १७ एप्रिलला दुपारी १२ वाजता शिवसेना हनुमान वाचेल, असा इशारा गुडधे यांनी दिला आहे.

राणांनी मतदार संघातील मस्जिदीसमोर चालिसा वाजवावा – देशमुख

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून येऊन शरद पवारांची स्तुती करायची आणि दुसरीकडे महाविकास आघाडीवर भाजपने ‘छु’ केल्यानंतर आरोप प्रत्यारोप करायचे हा आमदार राणा कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा धंदा झालेला आहे. हनुमान चालिसा पठन करायचा किंवा नाही हे हिंदूत्वाचे बाळकडू प्यायलेल्या शिवसेनेला शिकविणाऱ्या रवी राणा यांनी हिंमत असल्यास मातोश्री ऐवजी त्यांच्याच मतदारसंघातील मस्जिदसमोर हनुमान चालिसाचे पठन करावे असा सल्ला युवासेनेचे विभागीय सचिव सागर देशमुख यांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोप केले की आपण प्रसिद्धी झोतात येतो याची जाण झाल्याने त्याची नशा त्यांना चढली आहे. याचमुळे त्यांना भाजपकडून वाय दर्जाची सुरक्षा देखील बक्षिस स्वरूपाने बहाल केलेली आहे. खोट्या जात पडताळणीचा आधार घेऊन मिळालेली खासदारकी टिकविण्यासाठी राणा यांची कसरत सुरू असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.

Back to top button