Karnataka Election Results : हात, कमळ की ‘मोळी’? कर्नाटकचा आज फैसला

Karnataka Election Results : हात, कमळ की ‘मोळी’? कर्नाटकचा आज फैसला
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकची सत्ता कुणाला मिळणार, हे शनिवारी (दि. 13) मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. भाजप सत्ता राखणार की काँग्रेस भाजपकडून सत्ता हस्तगत करणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. मात्र, कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यास निधर्मी जनता दल किंगमेकर ठरू शकतो. त्यामुळे भाजप किंवा काँग्रेसला सोबतीला घेऊन निजद युतीची 'मोळी' बांधेल, अशी शक्यता आहे. डोक्यावर गवताची मोळी घेतलेली महिला हेच निजदचे पक्षचिन्हही आहे! (Karnataka Election Results)

राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान झाले. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. (Karnataka Election Results)

राज्यभरात 34 ठिकाणी मतमोजणी होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघांची मतमोजणी बेळगाव शहरातील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात होणार आहे. (Karnataka Election Results)

संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी कर्नाटक विधानसभा निवडणूक आगामी वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. इथे काँग्रेस जिंकली, तर केंद्रातही सत्तापालटाची आशा कांँगे्रससह तिसर्‍या आघाडीला राहील. मात्र, भाजप जिंकला, तर पुढच्या वर्षीची लोकसभा निवडणूक तो पक्ष आणखी जोमाने लढवेल. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. (Karnataka Election Results)

निवडणूकपूर्व चाचण्या आणि एक्झिट पोलमध्ये काँग्रेस हा 100 ते 110 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे; तर काही एक्झिट पोलनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊ केले आहे. कुणाचे भाकीत खरे, हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघांत 2,615 उमेदवार रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघांत 187 उमेदवार लढत आहेत.

लक्षवेधी लढती

राज्यात यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत चुरशीच्या लढती आहेत. त्यात प्रामुख्याने वरुणा, गोकाक, हुबळी, अथणी, निपाणी, चन्नपट्टण तसेच कनकपुरा या लढती लक्षवेधी आहेत.

म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या लढत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचे गृहनिर्माणमंत्री व्ही. सोमण्णा रिंगणात आहेत.

त्याचप्रमाणे संपूर्ण राज्याचे लक्ष हुबळी-धारवाड मध्य या मतदारसंघाकडे लागले आहे. या मतदारसंघात राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसकडून लढत आहेत. त्यांच्याविरोधात शेट्टर यांचेच शिष्य असलेले महेश टेंगीनकाई भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शेट्टर व तेंगीनकाई या गुरू-शिष्यामध्ये कोण बाजी मारणार, हे आज स्पष्ट होणार आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी मतदारसंघाचा निकाल अत्यंत औत्सुक्याचा विषय ठरला आहे. या मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे काँग्रेसकडून भाजप उमेदवार महेश कुमठळ्ळी यांच्याविरुद्ध लढत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ नेते असणारे सवदी भाजपचे किंगमेकर रमेश जारकीहोळींच्या दबावामुळे भाजप उमेदवारीपासून दूर राहिले. परिणामी, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली आहे.

गोकाक मतदारसंघातून माजी मंत्री रमेश जारकीहोळी लढत आहेत. कर्नाटकात भाजपला सत्तेवर आणणारे रमेश जारकीहोळीच होते. त्यांनी काँग्रेसच्या 17 आमदारांसह बंडखोरी केल्याने काँग्रेस-निजद सरकार कोसळले होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार व रमेश जारकीहोळी यांच्यातील वैर जगजाहीर आहे. त्याचबरोबर कनकपुरा मतदारसंघात शिवकुमार यांच्याविरुद्ध भाजपचे मंत्री आर. अशोक रिंगणात आहेत; तर कुमारस्वामींनी आपला चामराजनगर हा मतदारसंघ मुलासाठी सोडून चन्नपट्टणमधून लढणे पसंत केले आहे. त्यामुळे या लढतींकडेही लक्ष आहे.

निपाणीत राष्ट्रवादीचे घड्याळ धावणार का?

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा लढवत आहे. मात्र, सर्वाधिक चर्चा निपाणीची आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उत्तम पाटील, तर भाजपकडून मंत्री शशिकला जोल्ले व काँग्रेसकडून काकासाहेब पाटील लढत आहेत. तिरंगी लढत चुरशीची आहे. उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार आले होते. त्यामुळे निपाणीतून पहिले खाते राष्ट्रवादी उघडणार का, हे कळणार आहे.

इतिहास घडणार?

कर्नाटकात कुठल्याही पक्षाला सलग दोनदा सत्ता मिळालेली नाही. प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी पक्षाला बाजूलाच केले आहे. तो इतिहास यंदा कायम राहणार की, भाजप तो बदलणार, हे शनिवारी कळेल.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news