Suryakumar Yadav : ‘तुला मानलं भाऊ’! शतकवीर ‘सूर्या’दादाला ‘विराट’च्या ‘मराठी’तून शुभेच्छा… | पुढारी

Suryakumar Yadav : ‘तुला मानलं भाऊ’! शतकवीर ‘सूर्या’दादाला ‘विराट’च्या ‘मराठी’तून शुभेच्छा...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सचा सुपरस्टार सूर्यकुमार यादवने शुक्रवारी (दि.१२) झालेल्या गुजरात विरूध्दच्या सामन्यात शतकी खेळी केली. सूर्यकुमारने आयपीएलच्या करिअरमधील पहिलं शतक झळकवत इतिहास रचला. त्याच्या या शानदार खेळीचे अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करत आहेत. या सर्वांमध्ये बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने ही सूर्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. (Suryakumar Yadav)

सामन्यात सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत नाबाद १०३ खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना २० व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत त्याने पहिल्या शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ‘तुला मानलं भाऊ’, असं म्हणत सूर्याचा एक फोटो शेअर केला आहे. (Suryakumar Yadav)

सूर्यकुमारने १०३ धावांच्या खेळीत ११ चौकार आणि ६ षटकार लगावत वानखेडे स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला. सामन्यात चौफेर फलंदाजी करत सूर्यकुमारने गुजरात संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. सूर्यकुमार हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वोच्च हायस्कोअर करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

त्याच्या आधी मुंबईकडून सनथ जयसूर्या याने २००८ च्या आयपीएल हंगामत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ४८ चेंडूत नाबाद ११४ धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर रोहित शर्मा याने २०१२ सालच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नॉट आऊट १०९ धावांची खेळी केली होती. तर आजच्या सामन्यात सूर्याने ४९ बॉलमध्ये नाबाद १०३ धावांची शतकी खेळी केली.

हेही वाचा;

Back to top button