मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर शीख बांधवांबाबत वादग्रस्त पाेस्ट प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतला आज उच्च न्यायालयाने दिलासा दिला. याप्रकरणी कंगना हिला २५ जानेवारीपर्यंत अटक करु नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. कंगनाने पोलिसांना तपासात सहकार्य करण्याची तसेच पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची हमी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतर २१ नोव्हेंबर रोजी कंगनाने आपल्या इंन्स्टाग्रामवर शीख समुदायाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये खूपच नाराजी पसरली होती. मुंबई आणि दिल्लीतील विविध गुरुद्वारांच्या समित्यांचे सदस्य असलेले अॅड. अमरजितसिंग कुलवंतसिंग संधू, मनजिंदर सिंग सिरसा आणि जसपाल सिंग सिद्धू यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे खार पोलीस ठाण्यात कंगनाच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
यानंतर कंगनाने मी केलेली पोस्ट ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर बंदी घालण्यात आलेल्या एका संघटनेविराेधात होती. भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1)(अ) अन्वये भाषण स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारात मोडते. त्यामुळे आपल्या विरोधात नोंदविण्यात आलेला गुन्हा चुकीचा असल्याचा दावा करत तो रद्द करावा, अशी मागणी कंगना राणावतने उच्च न्यायालयात केली हाेती. या घटनेची आज सुनावणी होवून तिला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
हेही वाचलं का?