Jofra Archer
Jofra Archer

Jofra Archer : जोफ्रा आर्चरने मोडला ३० वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम (VIDEO)

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) आपल्या भेदक मा-याने फलंदाजांना चकित केले. द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या वन-डेमध्ये त्याने 9.1 षटकात 40 धावा देऊन 6 बळी घेत पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमचा 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.

कर्णधार जोस बटलरची शतकी खेळी आणि जोफ्रा आर्चरच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने अखेरच्या वन-दे सामन्यात द. आफ्रिकेचा 59 धावांनी पराभव केला. याचबरोबर इंग्लिश संघाने मालिकेतील पहिले दोन सामने गमावून 2-0 ने पिछाडीवर पडल्यानंतर शेवटच्या सामना जिंकून व्हाईटवॉश होण्यापासून आपली लाज वाचवली.

किम्बर्ले डायमंड ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 346 धावा केल्या. बटलरशिवाय डेव्हिड मलाननेही शतक झळकावले. या धावसंख्येचा पाठलाग करताना यजमानांचा संघ 43.1 षटकांत 287 धावांत गारद झाला. जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 6 विकेट घेऊन यजमान संघाचे कंबरडे मोडले.

या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार टेम्बा बावुमाचा निर्णय सुरुवातीला संघासाठी लाभदायक ठरला. इंग्लंडने अवघ्या 14 धावांत तीन विकेट गमावल्या. यादरम्यान जेसन रॉय 1, बेन डकेट शून्य आणि हॅरी ब्रूक्स 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र यानंतर सलामीवीर डेव्हिड मलानच्या साथीने जोस बटलरने चौथ्या विकेटसाठी 232 धावांची शानदार भागीदारी रचली आणि संघाला अडचणीतून बाहेर काढले.

बटलरने 127 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 131 धावा केल्या, तर डेव्हिड मलानने 114 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 118 धावा केल्या. याशिवाय मोईन अलीच्या 23 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने केलेल्या 41 धावांच्या खेळीमुळे संघाला ही मोठी धावसंख्या गाठता आली. यजमानांकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक 4 गडी बाद केले.

347 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली, पण एकही खेळाडू मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. या कालावधीत हेनरिक क्लासेन (80) आणि रीझा हेंड्रिक्स (52) यांनी अर्धशतके झळकावली मात्र ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

आर्चरने मोडला 30 वर्षांपूर्वीचा वासिम अक्रमचा विक्रम (Jofra Archer)

मालिकेतील पहिल्या सामन्यात आर्चरची धुलाई करणा-या द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी शेवटच्या सामन्यात इंग्लिश गोलंदाजापुढे लोटांगण घातले. आर्चरने तब्बल 6 विकेट्स घेत आपला बदला पूर्ण केला. याचबरोबर आर्चरने 30 वर्षांपूर्वीचा वासिम अक्रमचा विक्रम मोडला. द. आफ्रिकेच्या भूमीवर वन-डे सामन्यांमध्ये यजमान संघाविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी करणारा तो पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.

अक्रमने 1993 मध्ये द. आफ्रिकेत वनडे खेळताना 16 धावांत 5 बळी घेतले होते. त्याचवेळी भारताच्या चहलने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर वनडे खेळताना एका सामन्यात 22 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय या यादीत जेम्स अँडरसनचाही समावेश आहे. 2009 मध्ये अँडरसनने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर 23 धावांत 5 विकेट्स घेण्याची जबरदस्त कामगिरी केली होती.

द. आफ्रिकन भूमीवर ODI मध्ये यजमान संघाविरुद्धची सर्वोत्तम गोलंदाजी

6/40 – जोफ्रा आर्चर (2023)
5/16 – वसीम अक्रम (1993)
5/22 – युझवेंद्र चहल (2018)
5/23 – जेम्स अँडरसन (2009)

हेही वाचंलत का?

logo
Pudhari News
pudhari.news