पुढारी ऑनलाईन : शिंदे गटातील आमदार हे तात्पुरते गेले आहेत. जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत त्यांना काही सोयीसुविधा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटात जातो आणि निधी घेऊन परत येतो, असे देखील काहींनी म्हटले असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितल्याचा उल्लेख राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ते निधी मिळवण्यासाठी गेलेत. ते आमदार पुन्हा माघारी परतणार असल्याचे संकेत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिले आहेत. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गटातून अनेक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे मूळ निष्ठावंतांना पक्षात योग्य पद देणं ही भाजपसमोरील मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे शिंदे आणि भाजपमध्ये गेलेले इतर पक्षातील नेते हे माघारी परतण्याची दाट शक्यता असल्याचे देखील त्यांनी (Jayant Patil) म्हटले आहे.
अहमदनगरचे नामांतर आहिल्यादेवीनगर होणे हा आहिल्यादेवींच्या कर्तृत्वाचा गौरव आहे. सरकारने अहमदनगरचा 'अहिल्यानगर' असा नामांतरणाचा घेतलेला निर्णय योग्य असून त्याचे स्वागतच आहे. यावर मी आणखी काही बोलणार नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाकडे आवश्यक कागदपत्रांचा पाठपुरावा करून, राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्ष दर्जा पुन्हा मिळवू असा विश्वास देखील त्यांनी (Jayant Patil) माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे.