सांगली : वाळवा तालुक्यातील शिगावचे जवान रोमित चव्हाण काश्मीरमध्ये शहीद

सांगली : वाळवा तालुक्यातील शिगावचे जवान रोमित चव्हाण काश्मीरमध्ये शहीद
Published on
Updated on

बागणी : पुढारी वृत्तसेवा : शोपियातील जैनापोरा भागातील चेरबर्ग येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. दहशतवाद्यांना शरण या म्हणून सुरक्षा दलांकडून आवाहन करण्यात आले. या आवाहनाला दहशतवाद्यांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. या गोळीबाराला भीक न घालता निधड्या छातीने फायरिंग सुरू ठेवत दहशतवाद्यांवर हल्ला चढविणारे शिगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील वीर जवान रोमित तानाजी चव्हाण (वय 23) हे आपल्या एका सहकार्‍यासह शहीद झाले. संतोष यादव असे दुसर्‍या शहीद जवानाचे नाव आहे.

रोमित व संतोष हे दोन्ही जवान 1 राष्ट्रीय रायफलशी संबंधित होते. काश्मीर पोलिसातील एक वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, मृत दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. सुरक्षा दलांची मोहीम अद्यापही सुरू आहे. परिसरात अजूनही दहशतवादी आहेत. रोमित चव्हाण हे 17 मार्च 2017 रोजी सैन्यात भरती झाले होते. सध्या ते राष्ट्रीय रायफल अंतर्गत 4 महार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते.

सोपेर येथे 1 राष्ट्रीय रायफलमध्ये ते तैनात होते. हे ठिकाण श्रीनगरपासून साधारण 350 किलोमीटर अंतरावर आहे. येथून पुढे 20 किलोमीटर अंतरावर पाकिस्तान सीमा आहे. लगतच चेरमर्ग तसेच परिसरात दहशतवादी लपून असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. लष्कराने शोधमोहीम सुरू केली.

शनिवारी सकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास दहशतवादी लपून असलेल्या घराला रोमित आणि त्यांच्या सहकारी जवानांनी वेढा घातला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण येण्याची संधी दिली होती. वारंवार तसे आवाहन केले. पण दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. एक क्षणही पाऊल मागे न फिरविता रोमित व सहकारी जवानांनीही पुढे चाल करत दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. एका दहशतवाद्याचा खात्माही केला. पण याचवेळी दहशतवाद्यांकडून झाडल्या गेलेल्या काही गोळ्यांनी रोमित यांचा वेध घेतला. रोमित यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांचा याच तुकडीतील आणखी एक सहकारी जवान संतोष यादवही शहीद झाला.

घटनेची माहिती मिळताच शिगाव परिसरावर शोककळा पसरली. शहीद रोमित यांचे पार्थिव रविवारी संध्याकाळी उशिरा किंवा सोमवारी सकाळी शिगाव येथे अंत्यविधीसाठी संपूर्ण इतमामात आणले जाईल. शिगावचे सरपंच उत्तम गावडे, उपसरपंच शहाजी कांबळे, पोलिस पाटील नरेंद्र मधाळे, माजी सरपंच उदयसिंह पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील, अजित बारवडे, आजी-माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष विजय पाटील, आदींसह सर्वच पदाधिकार्‍यांनी वारणाकाठी रोमितच्या वीरोचित अंत्यसंस्कारासाठी नियोजन सुरू केले आहे. संपूर्ण शासकीय इतमामात शहीद रोमित यांना अखेरचा निरोप देण्यात येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news