शेती ही व्यवसायाची संधी, जपानमधील शेतकऱ्यांशी संवाद

शेती ही व्यवसायाची संधी, जपानमधील शेतकऱ्यांशी संवाद

जपानमधल्या शेतकर्‍यांशी प्रश्‍न-उत्तरं करणं हा एक वेगळा अनुभव होता. या सर्व शेतकर्‍यांना सक्षमपणे इंटरनेटचा वापर करता येतो. त्यांच्या उत्तरांतून एक जाणवले की हे सगळेच जण सकारात्मक द‍ृष्टिकोनाने भरलेले आहेत. क्षेत्रफळात भारतापेक्षा 9 पटीने लहान असलेला हा जपान देश भौगोलिक द‍ृष्टिकोनाने आणि हवामानाच्या बाजूने नैसर्गिकरीत्या थोडंसं डाव्या बाजूला झुकलेला असला तरी तिथल्या शेतकर्‍यांचे परिश्रम, प्रयत्नशीलता, चिकाटी आणि आशावाद यामुळे नक्‍कीच उजवा ठरतो, असे मला वाटते.' पूजा कुलकर्णी यांनी जपानमधील शेतकर्‍यांची भेट घेऊन तेथील भैागोलिक परिस्थिती, मशागतीची पद्धत, शेतीतील तंत्रज्ञान, पिके, राहणीमान, विचार इ. गोष्टी जाणून घेतल्या. त्यांची ही मुलाखत.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. जपानसारख्या तंत्रज्ञानाने प्रगत देशात शेती आणि त्यासंबंधी शेतकर्‍यांचे विचार जाणून घ्यायच्या हेतूने जपानमधल्या हिरोशिमा प्रांतात काम करणार्‍या शेतकर्‍यांना काही प्रश्‍न विचारले.

  • आपल्या पिकांचे अचानक हवामान बदलापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घेत आहात?

सोसाट्याच्या वार्‍यासाठी (कुंपण झाडांची रांग इ. वार्‍याचा जोर कमी करण्यासाठी उभारलेला अडथळा) तसेच मुसळधार पावसासाठी निचरा वाहिनीची योजना केली जाते. इथे वारंवार हवामानाचा अंदाज तपासावा लागतो. स्वचंलित स्कायलाईट उघड बंद करणार्‍या उपकरणाचा वापर, विनायल हाऊस बांधणे, पिकांचा विमा या गोष्टीही केल्या जातात.

  • Japan Farming Techniques तुम्ही सिंचन करत आहात का? (ठिबक सिंचन/स्प्रिंकलर सिंचन/इतर)

यातील 70 टक्के शेतकरी सिंचन करत नाहीत. ते विहिरीचे पाणी नळीचा वापर करून हाताने पिकांना देतात. 10 टक्के शेतकरी ठिबक सिंचन तर उर्वरित तुषार सिंचन करतात.

  •  तुम्ही वैयक्‍तिकरीत्या शेतीचे पाणी साठवता का?

यावर 20 टक्के शेतकर्‍यांनी 'होय' असे उत्तर दिले तर उरलेले 80 टक्के नाही म्हणाले. सरकार फार काही मदत करत नाही; पण आम्ही स्वयंपूर्ण आहोत. आम्ही कुणाची मदत घेत नाही. या उत्तरातून शेतकर्‍यांचा आत्मविश्‍वास दिसून आला.

  • जपानी शेती सर्व यांत्रिक आहे का? तुम्ही शेतीसाठी किती वेळ यंत्रे वापरता?

नफा सुरक्षित करण्यासाठी क्षेत्रे आणि उत्पन्‍न वाढवणे आवश्यक आहे आणि मर्यादित वेळेत प्रक्रिया करण्यासाठी मशिनची आवश्यकता आहे. इथे सुमारे 70-80 टक्के शेतीच्या कामासाठी मशिन वापरतात. मोठे शेतकरी आणि छोटे शेतकरी वापरत असलेल्या यंत्रात फरक असला तरीही प्रत्येक शेतकरी मशिन वापरतो. ट्रॅक्टरचा वापर अनिवार्य आहे. परंतु, कापणी आणि कीटकनाशक फवारणी अजूनही प्रामुख्याने हाताने केली जाते.

  • भारतातील शेतीसाठी गुरांसारखे पशुधन अजूनही अपरिहार्य आहे. जपानमध्ये कसे?

आजच्या काळात पशुधन अनावश्यक आहे. साधारण 40 वर्षांपूर्वी जपानमध्येसुद्धा पशूंच्या मदतीने शेतमालाची वाहतूक केली जायची आणि शेणाचा खत म्हणून वापर व्हायचा. तथापि, रासायनिक खते आणि यंत्रसामग्रीच्या वापरामुळे अकार्यक्षम पशुधनाची संख्या कमी झाली आहे. आधुनिक काळात जपानमध्ये गायी आणि घोडे लागवडीसासठी वापरण्यात येत असल्याचे ऐकिवात नाही. आता पशुधन शक्‍तीची गरज नाही.

  • तुम्ही कोणत्या प्रकारचे खत वापरता?

इथे 46% शेतकरी नैसर्गिक खते वापरतात आणि उर्वरित शेतकरी नैसर्गिक आणि रासायनिक अशा दोन्ही खतांचा वापर करतात.

  • सध्या जपानमध्ये 'खतेविरहित शेती' करण्यावर भर दिला जात आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते?

खतेविरहित शेती ही संपूर्ण जपानमध्ये 5% केली जाते आणि त्याचा उगाचच उदो उदो केला जातोय. जास्त प्रमाणात उत्पादन काढण्यासाठी खते आवश्यक आहेत.

  • सर्वात फायदेशीर पिके कोणती आहेत?

जपानमध्ये तांदूळ सर्वात जास्त पिकवला जातो. त्याखालोखाल लिंबूवर्गीय फळे, द्राक्षे, सॅलड भाज्या, मायक्रो लीफ, औषधी वनस्पती, पेर, टोमॅटो यांची वर्णी लागते.

  • तुमच्या पिकांचा विमा आहे का? तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा विमा आहे? सामील होण्याचे बंधन आहे का?

उत्पादन भरपाई विमा काढण्याचे कोणतेही बंधन नसून बर्‍याच शेतकर्‍यांनी शेतीचा विमा घेतलेला नाही. 2 लाख येनपेक्षा थोडा कमी खर्च आहे. (साधारण 1 लाख 35 हजार रुपये).

  •  शेतकरी म्हणून तुम्हाला कोणत्या समस्या भेडसावत आहेत?

हवामानातील प्रचंड चढ-उतार या नैसर्गिक समस्येसोबत नफा दर कपात, वित्तपुरवठा, कामगारांची कमतरता, शेतजमिनीला उत्तराधिकारी नसणे, पडीक शेतजमिनी या प्रश्‍नांचा तिढाही सुटत नाही. तसेच येत्या 10 वर्षांमध्ये भौतिक स्टोअरमधील विक्री घटत जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे ऑनलाईन वितरण विभाग अधिकाधिक कार्यक्षम कसा करता येईल, याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

  • शेती ही व्यवसायाची संधी आहे असे तुम्हाला वाटते का?

जपानी शेती संरचनात्मकद‍ृष्ट्या बदलाच्या काळात आहे, म्हणून इथे नक्‍कीच व्यवसायाची संधी आहे. कृषी उत्पादनांना मागणी आहे. परंतु, उत्पादक आणि लागवडीच्या क्षेत्रांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे ठोस उत्पादने बनवणे आणि वक्रीची ठिकाणे सुरक्षित करणे महत्त्वाचे आहे. जपानी शेतकरी वर्षानुवर्षे वृद्ध होत आहेत आणि त्यांचे उत्पादन कमी होत आहे. या गोष्टींकडेही व्यवसायाची संधी म्हणून बघणे गरजेचे आहे. कारण शेतकर्‍यांची संख्या जसजशी कमी होईल तसतसे त्यांचे मूल्यही वाढेल. शिवाय शेतीशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय अधिक चित्तवेधक नाही, असे इथल्या शेतकर्‍यांना वाटते.

  • असे कोणते जपानी कृषी तंत्रज्ञान किंवा पद्धत आहे ज्याबद्दल तुम्हाला इतर देशांतील शेतकर्‍यांनी जाणून घ्यावे असे वाटते?

हवामान बदलामध्ये काम करण्याची पद्धत, तांदळाच्या रंग निवडीचे तंत्रज्ञान, बॅक्टेरियल सेल वापर, संत्र्यांची छाटणी करायची पद्धत या गोेष्टी इतर देशांतील शेतकर्‍यांनी शिकून त्यांच्या देशातील शेतीत फायदेशीर ठरतात का बघाव्यात.

  • तुम्हाला असे वाटते का की अधिक तरुणांनी शेतीकडे लक्ष दिले पाहिजे?

दीर्घकाळात वाढणारा उद्योग म्हणून तरुणांनी शेतीकडे अधिक लक्ष द्यावे. आपण अशा युगात प्रवेश करत आहोत. जेथे शेती विविध मार्गांनी केली जाऊ शकते. पारंपरिक शेती, सेंद्रिय पद्धत तर आहेच; पण मातीविरहित शेती, आय ओटी आधारित सेन्सर नेटवर्क वापरणारी शेती अशा अनेक नवीन गोष्टींमुळे शेतीमध्ये व्यवसाय म्हणून मोठी क्षमता आणि पूर्वीपेक्षा अधिक वैविध्य आहे. तरुणाईने किमान साईड बिझनेस किंवा पार्टटाईम जॉब म्हणून शेती करावी. त्यामुळे त्यांना अधिक उत्पन्‍नाची संधी मिळू शकते.

  • तुम्हाला जगाला काही सांगायचे आहे का?

अन्‍न, वस्त्र आणि निवारा यानेच अवनि (पृथ्वी) तयार होते. यातील प्रत्येक गोष्टीची निर्मिती ही ज्या स्थानानुसार हवामान-वातावरणानुसार वेगळी असेल. कदाचित काहीवेळा इतर देशांच्या कृषी पद्धतींचा वापर करणे योग्य नसेल म्हणून स्थानावर अवलंबून कीटकनाशके, खते, कृषी यंत्रणा इत्यादी तयार करणे आवश्यक आहे. आम्ही देवाण-घेवाणीचे स्वागत करतो. प्रत्येक ठिकाणची अनोखी शेती, अन्‍न आणि ग्रामीण संस्कृतीचे रक्षण करून त्याचे सापेक्ष मूल्य वाढवा. आपण स्वतःच्या शेतीचे आणि ग्रामीण भागाचे जैवविविधतेच्या द‍ृष्टिकोनातून संरक्षण केले पाहिजे. ग्रामीण संस्कृती आणि देशी वाण ही महत्त्वाची संसाधने आहेत जी हरवली तर परत मिळू शकत नाहीत. चला, मातीमध्ये प्रेमाने भाज्या वाढवूया.

शब्दांकन : पूजा कुलकर्णी-केणी, (टोकियो, जपान)

हेही वाचल का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news