पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कारागृह महासंचालक हेमंत कुमार लोहिया यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना साेमवारी रात्री घडली. या प्रकरणी त्याच्या नोकरावर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या हत्येची जबाबदारी दहशतवादी संघटना 'टीआरएफ'ने घेतली आहे. ( Jail DGP Lohia Murder ) मात्र प्राथमिक तपासात जम्मू-काश्मीर पोलिसांनी यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्यास नकार दिला आहे.
लोहिया हे पत्नीसहमित्र संजीव खजूरिया यांच्या घरी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते एका खोलीत बसले होते. काही वेळात लोहिया यांच्या ओरडण्याचा आवाज आला. खजूरिया कुटुंबीयांनी खोलीकडे धाव घेतली. यावेळी लोहिया रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. मारेकर्याने काचेच्या बाटलीने हेमंत कुमार लोहिया यांचा गळा चिरला. तसेच त्यांच्या पोटावरही वार केले. यानंतर त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.
मारेकरी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. रामबन येथील रहिवासाी यासिर या लाेहियांच्या नोकराने हे कृत्य केले असावे, असा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी संजीव खजूरिया याचा लहान भाऊ राजू खजुरिया यालाही पोलिसांनी अटक केली आहे. राजू हा पोलीस कर्मचारी असून, तो संजीव खजूरिया यांच्या सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होता. त्याची चाैकशी सुरू असून
फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
टीआरएफ या दहशतवादी संघटनेने लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. आपल्या विशेष पथकाने आज गुप्त ऑपरेशन यशस्वी केले. कारागृह महानिरीक्षक हेमंत कुमार लोहिया यांची हत्या करण्यात आली आहे. ही आता हाप प्रोफायल ऑपरेशनची सुरुवात असून यापुढेही असे हल्ले होतील, अशी धमकीही टीआरएफने दिली आहे.
कारागृह महासंचालक हेमंत कुमार निर्घृण हत्येने पुन्हा एकदा काश्मीर खोरे हादरले आहे. या हत्येची जबाबदारी 'द रिजिस्टेंस फ्रंट'
( टीआरएफ ) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. यामुळे टीआरएफ ही संघटना चर्चेत आली आहे. जाणून घेवूया या दहशतवादी संघटनेविषयी. २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यापूर्वी टीआरएफने काश्मीर खोर्यात दहशत माजविण्यास सुरुवात केली होती. या संघटनेला पाकिस्तानची गुप्तचर संस्था 'आयएसआय'चीसाथ मिळाली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवले. यानंतर ही संघटना काश्मीरमध्ये अधिक सक्रीय झाल्याचे मानले जाते.
पाकिस्तानच्या पाठिंब्यावरच टीआरएफचा जन्म झाला. लश्कर-ए-तौयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटना निशाणावर होत्या. त्यांच्यावर कारवाईचे आंतरराष्ट्रीय पातळीवरुन संकेत मिळत होते. यामुळे पाकिस्तानच्या 'आयएसआय' आणि लष्कर-ए-तौयबा या दहशतवादी संघटनेने मिळून 'टीआरएफ' संघटना स्थापन केली. आर्थिक कृती शीघ्र दलाच्या ( एफएटीएफ ) कारवाईतून पळवाट काढण्यासाठीही या संघटनेची स्थापना झाल्याचे मानले जाते. पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये दहशत माजविणे एवढेच या संघटनेचे उद्देश आहे.
मागील काही महिन्यात काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यामागे 'टीआरएफ'चा हात असल्याचा संशय व्यक्त होत होता. टीआरएफ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. तसेच काश्मीरमधील राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक घडामोडींवरही लक्ष ठेवून असते. यातूनच ही दहशतवादी संघटना दहशतवादी हल्ल्याचा कट रचते. या संघटनेच्या हिटलिस्टवर भाजपचे नेते, भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आहेत.
हेही वाचा :