गुहागर, पुढारी वृत्तसेवा : आमदार भास्कर जाधव यांचे आमदार शेखर निकम, मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदास कदम, माजी आमदार रमेश कदम, खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबर पटत नाही. प्रत्येकाला एकमेकाशी भांडणासाठी प्रवृत्त करायचे हा त्यांचा स्वभाव आहे. अशा माणसाला 2024 च्या निवडणुकीत जागा दाखविण्यासाठी तुम्ही तयार रहा. त्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत करायला कायम तयार आहे, अशा शब्दांमध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी शृंगारतळी येथे जाहीर सभेत भास्कर जाधव यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबाेला केला. ( Nilesh Rane)
निलेश राणे म्हणाले की, स्व. तात्या नातू आणि डॉ. विनय नातूंनी ४० वर्षात गुहागर मतदारसंघाला एका उंचीवर नेऊन ठेवले. अशा मतदारसंघाचे नाव 15 वर्षात आमदार बनुन भास्करने घालवले. डॉ. नातूंच्या घरात एकही ठेकेदार नाही. याउलट येथील विकासकामे आमदार जाधव यांचेच 5 ठेकेदार घेतात. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील स्टॉलधारकांना यांनी तोडले. मात्र वेळणेश्र्वरचा आमदारांचा सीआरझेड मधील बंगला सुरक्षित आहे. या बंगल्याकडे जाणारा रस्ता शासकीय खर्चाने चकाचक बनवला. मात्र गुहागर तालुक्यातील ग्रामीण रस्ते कच्चे, गुहागर विजापूर महामार्गाचे काम अर्धवट आहे. ठेकेदारीत आमदार ५ टक्के घेतात. गुहागर मतदारसंघातील अनेक जागा जमीनी यांच्या एजंटांनी विकल्या आहेत. अशा आमदाराला जागा दाखवून द्या, असेही ते म्हणाले.
चिपळूणातील कार्यक्रम आटपून गुहागरच्या सभेला येताना निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. निलेश राणेंनी या सभेची सुरवातच आमदार भास्कर जाधव यांचा एकेरी उल्लेख करुन केली. ते म्हणाले, "मी नीलेश नारायणराव राणे अशीच ओळख सांगतो. मी वडिलांसाठी जगतो. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या प्रत्येक टीकेला निलेश राणे उत्तर देणार. राज्यात कुठेही जाऊन भास्कर जाधव यांनी टीका केली तर तिथे जावून सभा घेणार, असेही ते म्हणाले.
यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार विनय नातू, प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रशांत शिरगांवकर, संध्या तेरसे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश महामंत्री मुश्ताक दळवी, सिंधुदूर्ग जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष संजय परब यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा