पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायल आणि हमास यांच्यातील रक्तरंजित संघर्ष २३ दिवस झाले सुरूच राहिला आहे. हमासच्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर, इस्रायलने हमासचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासचा नेता याह्या सिनवार याने ओलिसांसंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्याने ओलिसांच्या बदल्यात इस्रायलला पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील वृत्त 'द जर्नलिजम पोस्ट'ने दिले आहे. (Israel-Palestine War)
सिनवार याने निवेदनात म्हटले आहे की, आम्ही इस्रायलसोबत ओलिसांच्या तात्काळ अदलाबदलीसाठी तयारी दाखवली आहे; पण आमची अट आहे की, इस्रायलच्या तुरुंगात बंद असलेल्या सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची इस्रायलने सुटका करावी. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला होता. तसेच इस्रायलच्या विरोधी निदर्शने केल्यामुळे अटक करण्यात आले आहे. असे हमासच्या नेत्याने केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Israel-Palestine War)
इस्त्रायल संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गाझामध्ये ओलीसांची अधिकृत संख्या २३० झाली आहे. दरम्यान, हमासने या आठवड्याच्या सुरुवातीला दावा केला होता की, इस्रायली हवाई हल्ल्यात ५० ओलिस मारले गेले, मात्र यासंदर्भात हमासने कोणताही पुरावा दिलेला नाही. हमासच्या अल-कसाम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू ओबैदा यांनी दहशतवादी गटाच्या टेलिग्राम चॅनलवर ही माहिती दिली होती.
इस्रायमध्ये ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्याचा याह्या सिनवार हा मास्टरमाईंड मानला जातो. त्यादिवशी झालेल्या हल्ल्यात १४०० लोक मारले गेले होते, तर २९९ लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. या हल्ल्याला देखील इस्रायलने प्रत्युत्तर दिले होते, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये ७३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये सुमारे तीन हजार मुलांचा समावेश होता.