पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक आठवड्यांपासून युद्ध सुरू आहे. ज्यामध्ये आतापर्यंत सुमारे ७,३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराच्या मुख्य प्रवक्त्याने सांगितले की, इस्रायली हवाई दल आणि भूदलाने गाझा पट्टीमध्ये कारवाई तीव्र केली आहे. याशिवाय इस्रायलने गाझामध्ये इंटरनेट आणि मोबाइल फोन सेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गाझामधील लोकांचा आता बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. (Israel-Hamas War)
अमेरिकन मीडियाच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये इस्रायलच्या घुसखोरीमुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. या कारवाईत आणखी लोकांचा बळी जाऊ शकतो आणि प्रादेशिक तणावही वाढू शकतो. इस्रायलच्या जमिनीवरील वाढत्या कारवायांमुळे ओलिसांच्या सुटकेबाबत सुरू असलेली चर्चा विस्कळीत होऊ शकते, अशी भीती अमेरिकन अधिकाऱ्यांना वाटते. (Israel-Hamas War)
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी सांगितले की, इंटरनेट आणि मोबाइल सुविधा निलंबित केल्यामुळे संस्था आपल्या कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क स्थापित करू शकत नाही. त्यांनी सर्व नागरिकांचे तात्काळ संरक्षण आणि संपूर्ण मानवतावादी मदतीचे आवाहन केले आहे. "आम्ही आरोग्य कर्मचार्यांसह गाझामधील आमचे कर्मचारी आणि इतर मानवतावादी भागीदारांशी संपर्क गमावला आहे," असे देखील टेड्रोस घेब्रेयसस यांनी ट्विटरवर सांगितले आहे. या कारवाईमुळे मला लोकांच्या सुरक्षेची चिंता वाटत आहे. त्यामुळे आम्ही इस्रायल सरकारला सर्व नागरिकांचे तात्काळ संरक्षण आणि संपूर्ण मानवतावादी मदतीची विनंती करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.