रक्‍तरंजित संघर्षाचे तीन महिने..! इस्‍त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत काय घडलं?

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ७ ऑक्‍टोबर २०२३ ची पहाट इस्‍त्रायलला मुळापासून हदरविणारी ठरली. हमासने केलेल्‍या भीषण हल्‍ल्‍यात १,२०० इस्रायली नागरिक मारले गेले तर २०० हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवले गेले. या हल्‍ल्‍यास इस्‍त्रायलनेही सडेतोड प्रत्‍युत्तर दिले. आतापर्यंत हमासचे ८ हजारांहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्याचा इस्‍त्रायलने केला आहे. तर या संघर्षात आतापर्यंत १७५ इस्‍त्रायलचे सैनिक ठार झाले आहेत. इस्‍त्रायलच्‍या हल्‍ल्‍यात हजारो महिला आणि मुलांसह आतापर्यंत २२ हजार ७२२ नागरिक ठार झाले आहेत. गाझा शहर पूर्णत: उद्‍ध्‍वस्‍त झाले आहे. आज (दि.७ जानेवारी) या रक्‍तरंजित संघर्षाला ९० दिवस पूर्ण झाली असून, आता आम्‍ही अंतिम टप्‍प्‍यात प्रवेश करत आहोत, असा दावा इस्‍त्रायलच्‍या संरक्षण मंत्रालयाने केले आहे. ( Israel-Hamas War completes 3 months)

युद्ध सुरुच राहिल :  इस्‍त्रायलची स्‍पष्‍टाेक्‍ती

युद्धाचा भडका उडाल्‍यानंतर इस्‍त्रायलने सुमारे तीन लाखांहून अधिक राखीव सैनिकांना कर्तव्‍य बजावण्‍याचे आवाहन केले. पाच ब्रिगेड, 24 बटालियन आणि अंदाजे 140 कंपन्यांमध्ये विभागण्यात आले होते. आता युद्धाला तीन महिन्‍यांचा कालावधी झाल्‍यानंतर इस्‍त्रायलच्‍या सैन्‍याचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे की, युद्ध सुरुच राहिल. आम्ही त्यानुसार तयारी करत आहोत. आम्‍ही काही राखीव सैनिकांना पुन्‍हा घरी पाठवले आहे. आता हे लोक आपल्‍या दैनंदिन कामावर परतल्‍यानंतर अर्थव्यवस्थेवरील भार कमी होणार आहे. ( Israel-Hamas War completes 3 months)

इस्त्रायली सैन्याचे लक्ष्‍य दक्षिण गाझा…

'जेरुसलेम पोस्ट'ने दिलेल्‍या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने आता दक्षिण गाझा पट्टीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. हे क्षेत्र हमासच्या लष्करी पायाभूत सुविधांचे केंद्र मानले जाते, या भागात भूमिगत बोगद्याचे जाळे आहे. येथे बहुतेक इस्रायली ओलीस ठेवण्याची शक्यता आहे. ( Israel-Hamas War completes 3 months)

इस्रायलची वाटचाल आता संथ युद्धाकडे

हमासचा पाडाव करणे, त्याची लष्करी क्षमता नष्ट करणे आणि सर्व ओलीसांची सुटका करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्‍हटले होते. आता परिस्थितीत इस्रायल आता संथ युद्धाकडे वाटचाल करत आहे. तसेच इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे प्रादेशिक संघर्षाचीही शक्यता निर्माण झाली आहे. लेबनीज संघटना हिजबुल्लाहने पॅलेस्टिनींशी एकता दाखवण्यासाठी ऑक्टोबर २०१५ नंतर इस्रायलवर रॉकेट डागण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ईस्‍त्रायलचे सैन्‍य आणि हिजबुल्लाह यांच्यात जवळपास दररोज गोळीबार सुरु आहे. ( Israel-Hamas War completes 3 months)

हमासच्‍या ८ हजार दहशतवाद्यांना ठार मारल्याचा इस्रायलचा दावा

उत्तर गाझामधील हमासची लष्करी चौकटच नष्ट केली आहे. उत्तर गाझामध्ये सुमारे 8,000 हमास दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा इस्रायलने केला आहे. गाझाच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागात हमासचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी लष्‍करी कारवाई सुरु आहे, युद्धाच्या नवीन टप्प्याकडे आमची वाटचाल सुरु आहे, असे इस्रायल संरक्षण दलाचे (आयडीएफ) प्रवक्‍ते, रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी यांनी म्‍हटले आहे.

२३ हजारांहून अधिक नागरिक मृत्‍युमुखी, ७० टक्‍के महिला आणि मुलांचा समावेश

गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, युद्ध सुरू झाल्यापासून या भागात सुमारे 23 हजार नागरिक ठार झाले आहेत, असा दावा गाझा मंत्रालय करत आहे. हे मंत्रालय नागरिक आणि सैनिक यांच्यात फरक करत नाही, परंतु गाझामधील मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे की, या युद्‍धात मृत किंवा जखमींपैकी ७० टक्‍के महिला आणि मुले आहेत.

ओलिसांच्‍या सुटकेसाठी काही दिवस दोन्ही बाजूंनी युद्धविराम

नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या अखेरीस ओलिसांच्‍या सुटकेसाठी इस्‍त्रायल आणि हमास यांच्‍या युद्धविरामासाठी सहमती झाली. युद्धविराम करारानुसार इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आणि हमासने इस्रायली ओलीस सोडले. युद्धबंदीच्या शेवटच्या दिवशी 8 इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात आली त्या बदल्यात इस्रायलने 30 पॅलेस्टिनींची सुटका केली. यामध्ये 22 मुले आणि 8 महिलांचा समावेश होता. मात्र सात दिवसांच्या विरामानंतर २ डिसेंबर २०२३ रोजी युद्ध पुन्हा सुरू झाले. इस्‍त्रायलने गाझावरील हल्‍ले आणखी तीव्र केले.

हवाई हल्ल्यात किमान 12 लोक ठार आणि 50 जण जखमी

गाझा शहरात दक्षिणेकडील भागात इस्रायली सैन्याने शनिवारी (दि.६ जानेवारी) केलेल्‍या हल्‍ल्‍यात १२ नागरिक ठार झाले तर ५० जण जखमी झाले. मध्य गाझा येथील शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात आणखी चार जण ठार झाल्‍याचे वृत्त पॅलेस्टिनी वृत्तसंस्था WAFA ने सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news