पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायल आणि हमास युद्धाला विराम मिळणार, या चर्चेला पुन्हा एकदा पूर्णविराम मिळाला आहे. हमासने ओलिस ठेवलेल्या नागरिकांची यादी सादर करण्यास नकार दिला. या कारणामुळे इस्रायलने युद्धविराम चर्चेवर बहिष्कार घातल्याचे वृत्त 'द इस्त्रायल टाईम्स'ने दिले आहे. दरम्यान, गाझामधील भयावह परिस्थिती पाहता तात्काळ तात्पुरती युद्धविरामाबाबत निर्णय घेतला पाहिजे, असा पुनरुच्चार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी केला आहे.
हमासचे शिष्टमंडळ चर्चेसाठी कैरो येथे आले. ओलिस ठेवलेल्या नागरिकांची यादी सादर करावी, अशी मागणी इस्त्रायलने केली. मात्र ही मागणी पूर्ण झाली नाही. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोसादचे संचालक डेव्हिड बारनिया यांच्या समन्वयाने चर्चेला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तात्पुरत्या युद्ध विरामाला चर्चेला पूर्णविराम मिळाला.
यापूर्वीअमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायल आणि हमासमध्ये सोमवार ४ मार्चपर्यंत युद्धविराम होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. दोन्ही बाजू प्रस्तावित सहा आठवड्यांच्या युद्धविराम कराराच्या जवळ आहेत, असेही त्यांनी म्हटलं होते.
इस्त्रायली सैन्याने शनिवार, २ मार्च रोजी रफाह शहरातील रुग्णालयाजवळील निर्वासितांच्या शिबिरावर बॉम्बफेक केली. यामध्ये १७ पॅलेस्टिनी ठार आणि ५० जण जखमी झाले. गाझामधील आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की इस्रायली सैन्याने देर अल-बालाह आणि जबलिया येथील तीन घरांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 17 पॅलेस्टिनी ठार झाले तर डझनभर जखमी झाले.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्त्रायलवर हल्ला केला. शेकडो नागरिकांचे अपहरण केले. याला इस्त्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत इस्रायलमधील १,२०० नागरिक ठार झाले आहेत. तर इस्रायली सैन्याने 30,000 हून अधिक पॅलेस्टिनींना ठार मारले आहे, गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ढिगाऱ्याखालून आणखी हजारो मृत सापडण्याची भीती आहे.
हेही वाचा :