पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील रक्तरंजित संघर्ष सुरुच आहे. दक्षिण गाझामध्ये (south Gaza) इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील तब्बल ७६ जणांचा मृत्यू झाला आहे, असे वृत्त असोसिएट प्रेस वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान, इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये मानवतावादी मदत वितरणात मोठ्या प्रमाणावर अडथळा येत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
(Israel-Hamas war )
गाझा शहरातील दक्षिण भागातील शुक्रवारी (दि.२२ ) इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इमारत बेचिराख झाली. हा हवाई हल्ला इस्रायल-हमास युद्धातील एकाच दिवसातील सर्वात प्राणघातक ठरला. या हल्ल्याबाबत माहिती देताना गाझाच्या नागरी संरक्षण विभागाचे प्रवक्ते महमूद बस्सल यांनी सांगितले की, "अल-मुग्राबी कुटुंबातील 16 कुटुंबप्रमुखांसह महिला आणि मुलांचा ७६ जण ठार झाले. मृतांमध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे ज्येष्ठ कर्मचारी इसाम अल-मुग्राबी, त्यांची पत्नी आणि त्यांच्या पाच मुलांचा समावेश आहे."
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यात १२०० नागरिक मृत्युमुखी पडले. तर 240 नागरिकांना हमासने ओलिस ठेवले. यानंतर इस्रायलनेही सडेतोड प्रत्युतर दिले. आतापर्यंत या युद्धात 20,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि 53,000 हून अधिक जखमी झाले आहेत.
हेही वाचा :