पुढारी ऑनलाईन डेस्क : इराण येत्या २४ तासांत इस्रायलवर थेट हल्ला करण्याची शक्यता आहे. या शक्यतेमुळे पश्चिम आशियात मोठा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. इस्रायलने काही दिवसांपूर्वी दमास्कस येथील इराणाच्या दूतावासावर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या दोन उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणने या हल्ल्याचे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता. (Iran Israel Conflict)
अमेरिका आणि इतर काही देशांच्या गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने या हल्ल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "अशा प्रकारचा हल्ला लवकरच होईल असे दिसते. पण इराणने असे करू नये." ही बातमी NDTVने दिलेली आहे.
वॉल स्ट्रीट जर्नल आणि ब्लुमबर्ग यांनी ही बातमी दिली आहे. इराण येत्या २४ तासात इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करेल असे यात म्हटले आहे. इराणकडे २ हजार किलोमीटर लांब अंतरावर हल्ला करण्याची क्षमता आहे. (Iran Israel Conflict)
गुप्तचर खात्यांच्या अहवालानंतर अमेरिकेने भूमध्य सागरातील पूर्व दिशेला दोन लढाऊ नौका तैनात केल्या आहे. या भागातील अमेरिकेच्या लष्करी फौजा आणि इस्रायलच्या मदतीसाठी या नौका कार्यरत असतील. तसेच दुसरीकडे अमेरिका राजनयिक पातळीवर इराण आणि इस्रायल यांच्यात थेट संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. सौदी अरेबिया, कतर आणि इतर काही मित्रराष्ट्रांच्या मदतीने अमेरिका इराणशी संवाद साधत आहे. तसेच अमेरिकेच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी मायकेल कुरिला यांनाही इस्रायलमध्ये पाठवण्यात आले आहे.
गाझातील दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबर २०२३ला इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यात १२०० इस्रायली नागरिक मारले गेले. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ले सुरू केले, यात ३२ हजारावर नागरिक मारले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी इस्रायलने इराणच्या दमास्कस येथील दूतावासावर हल्ला केला, त्यात ७ लोक मारले गेले. मृतांत इराणाच्या दोन उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
हेही वाचा