पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 16व्या हंगामात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचवे विजेतेपद मिळवले. या शानदार कामगिरीसह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक 5 जेतेपद पटकावण्याच्या पराक्रमाची बरोबरी केली. याचबरोबर सीएसकेने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात अनेक विक्रम केले.
टॉस जिंकत चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या आणि वृद्धीमान सहाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २१४ धावा केल्या आणि चेन्नईसमोर २१५ धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान, चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी उतरल्यानंतर पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे ३ चेंडूमध्ये ४ धावा चेन्नईने काढल्या आणि सामना पावसामुळे थांबला होता. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांमध्ये १७१ धावांचे आव्हान देण्यात आले.
गुजरातचे हे आव्हान रवींद्र जडेजाने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत गाठले. चेन्नईकडून डेवॉन कॉनवे २५ चेंडूमध्ये ४७, शिवम दुबे २१ चेंडूमध्ये ३२, ऋतुराज गायकवाड १६ चेंडूमध्ये २६, रवींद्र जडेजा ६ चेंडूमध्ये १५, अजिंक्य रहाणे ६ चेंडूमध्ये १५ आणि अंबाती रायडूने ८ चेंडूमध्ये १९ धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, साई सुदर्शनच्या फटकेबाजीमुळे गुजरातला मोठी धावसंख्या उभारता आली आहे. सुरुवातीला शुभमन गिल आणि वृद्धीमान सहाने तर शेवटच्या षटकांमध्ये साई सुदर्शन आणि हार्दिक पंड्याने चेन्नईच्या फलंदाजांची चागंलीच धुलाई केली. गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलने २० चेंडूमध्ये ७ चौकारांच्या सहाय्याने ३९ धावा, वृद्धीमान सहा ३९ चेंडूमध्ये ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५४ धावा, साई सुदर्शनने ६ षटकार आणि ८ चौकारांच्या सहाय्याने ४७ चेंडूमध्ये ९६ धावा आणि हार्दिक पंड्याने १२ चेंडूमध्ये २१ धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी १ विकेट पटकावली.
चेन्नईचा संघ – ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक चहर, मथीशा पथीराणा, तुषार देशपांडे, महिश तीक्ष्णा (IPL Final 2023)
गुजरातचा संघ – वृद्धीमान सहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी (IPL Final 2023)