पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 : महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल दरम्यान मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. स्पर्धेतील तीन सामन्यांत सर्वाधिक सात विकेट्स घेऊन सीएसकेसाठी पर्पल कॅप जिंकणारा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान बांगलादेशला त्याच्या घरी परतला आहे. त्यामुळे तो गुरुवारी (दि. 5) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळवल्या जाणा-या सामन्यात संघासोबत नसेल असे मानले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुस्तफिजुर रहमान सध्या बांगलादेशातील त्याच्या घरी आहे आणि तो आयपीएल 2024 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी पुढील काही सामने खेळू शकणार नाही.
मुस्तफिजुर व्हिसा संबंधित समस्या सोडवण्यासाठी बांगलादेशला गेला आहे. कारण आयपीएल 2024 च्या हंगामानंतर जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात सहभागी होण्यासाठी मुस्तफिझूर त्याच्या अमेरिकेच्या व्हिसासाठी बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मायदेशी गेला आहे. त्यांची अपॉइंटमेंट 4 एप्रिल रोजी असून त्यानंतर त्याला प्रतीक्षा कालावधीतून जावे लागणार आहे. त्यामुळेच तो सीएसकेसाठी पुढील काही सामने खेळू शकणार नाही असे समजते आहे. (IPL 2024)
28 वर्षीय मुस्तफिझूर रहमान हा बांगलादेश संघाचा मुख्य डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने बांगलादेशकडून आतापर्यंत 91 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 107 बळी घेतले आहेत. तर आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 51 सामन्यात 54 विकेट्स आहेत.