IPL 2021 : चेन्नईशी कोण लढणार? कोलकाता की दिल्ली..

IPL 2021 : चेन्नईशी कोण लढणार? कोलकाता की दिल्ली..
Published on
Updated on

शारजाह ; वृत्तसंस्था : (IPL 2021) इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेतील पहिले जेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सामना बुधवारी दुसर्‍या क्वालिफायरमध्ये फॉर्मात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाशी होणार आहे. दिल्लीला पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभूत व्हावे लागले.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या संघाला कोलकाता विरुद्ध पराभूत व्हावे लागल्यास त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत केल्यानंतर कोलकाताचा आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे सध्या तरी कोलकाताचे पारडे जड दिसत आहे. मात्र, दिल्लीलादेखील कमी समजून चालणार नाही. (IPL 2021)

दिल्लीच्या संघाने लीगमध्ये 10 सामने जिंकत 20 गुणांची कमाई केली व 'प्ले ऑफ'साठी पहिल्या क्रमांकाने पात्रता मिळवली. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षक म्हणून संघासोबत आल्यानंतर दिल्लीचा संघ मजबूत झाला आहे. संघ 2019 मध्ये तिसर्‍या स्थानी राहिला होता. तर, गेल्या वर्षी दिल्लीने अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी संघाचा प्रयत्न हा जेतेपद मिळवण्याचा असणार आहे. दिल्लीचा संघ स्पर्धेतील संतुलित संघांपैकी एक आहे. त्यांच्याकडे मजबूत फलंदाजी फळीशिवाय चांगले जलदगती गोलंदाजी आक्रमणदेखील आहे.

शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर संघात असल्याने त्यांचा आघाडी फलंदाजी क्रम मजबूत आहे. धवनने गेल्या सत्रात 618 धावा केल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या सत्रात त्याने 551 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कॅगिसो राबाडा आणि एन्रिच नॉर्त्जे चांगली गोलंदाजी करीत आहेत. तर, आवेश खानने 23 विकेटस् मिळवल्या आहेत.

दिल्लीसाठी फायनलला पोहोचणे सोपे नसेल. कारण, भारतात झालेल्या पहिल्या सत्रात निराशाजनक कामगिरीनंतर इयान मॉर्गनच्या संघाने यूएईच्या सत्रात जोरदार पुनरागमन केले. संघाने चांगल्या नेट रनरेटच्या आधारे पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाला मागे टाकत 'प्ले ऑफ'मध्ये आपले स्थान पक्के केले. (IPL 2021)

फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांच्यासमोर दिल्लीच्या फलंदाजांचा चांगला कस लागेल. शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांच्याकडून संघाला पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. यासोबत मॉर्गनकडूनदेखील चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news