International Womens Day : धैर्य, जिद्दीच्या जोरावर प्रवाशांचे सारथ्य

International Womens Day : धैर्य, जिद्दीच्या जोरावर प्रवाशांचे सारथ्य
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : इलेट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीची पदवी घेतलेली, यामुळे चारचौघींसारखीच कंपनीच्या एसी कार्यालयात नोकरी करणे शक्य होते; मात्र परीक्षा दिली. उत्तीर्ण झाले. त्यानंतर समोर येणार्‍या प्रत्येक आव्हानाचा सामना केला. तुला हे जमणार नाही, असे मैत्रिणी म्हणायच्या; पण तिने करून दाखवले. धैर्य आणि जिद्दीच्या जोरावर ती सहायक लोको पायलट म्हणून दररोज शेकडो रेल्वे प्रवाशांचे सारथ्य करत आहे. मीनाक्षी आकाराम दबडे असे या युवतीचे नाव आहे. (International Womens Day)

मूळची कृष्णनगर, कारंदवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील मीनाक्षी सध्या आई-वडील आणि भावासह सांगलीत राहते. सर्वसामान्य कुटुंबातील मीनाक्षीने बी.ई. केले. बँकिंगची तयारी करतानाच रेल्वे लोको पायलटची परीक्षा दिली आणि त्यात ती उत्तीर्णही झाली. भुसावळला प्रशिक्षणासाठी जाईपर्यंत तिला या कामाचे स्वरूप आणि आव्हान माहीत नव्हते; मात्र पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात केवळ जिद्दीच्या जोरावर करिअर करायचे तिने ठरवले आणि त्यात ती यशस्वी झाली.

प्रशिक्षणानंतर पहिली दोन वर्षे ती मालगाडीवर सहायक लोको पायलट म्हणून कार्यरत होती. रात्री-अपरात्री करावी लागणारी ड्युटी, त्यात महिला म्हणून येणार्‍या अडचणी वेगळ्याच; पण ती कधी डगमगली नाही. मालगाडीवरून ती आता नोकरी, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, दैनंदिन कामकाज यासाठी दररोज प्रवास करणार्‍यांची गर्दी असणार्‍या पॅसेजर गाडीवर (डेमू) सहायक लोको पायलट म्हणून काम करत आहे. (International Womens Day)

या क्षेत्रात आव्हान आहे; पण कोणतीही गोष्ट कठीण परिश्रम घेतले की, सहज पेलता येते, असे मीनाक्षी सांगते. सहायक म्हणून काम करते, नंतर लोको पायलट म्हणून जबाबदारी मिळेल. त्याचे स्वतंत्र प्रशिक्षण असेल; पण धैर्य आणि जिद्दीच्या जोरावर सर्व आव्हाने पेलता येतात, यावर विश्वास असल्याचे मीनाक्षी सांगते. इंजिनमध्ये असताना लोक पाहतात, विशेषत: महिला पाहत असताना त्यांच्या चेहर्‍यावरचे कौतुकाचे भाव मोठे समाधान देतात, अशा भावना तिने व्यक्त केल्या. रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सहकार्याने हा पल्ला सहज गाठला असल्याचेही तिने सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news