महिला कैद्यांना मिळणार शिलाईचे प्रशिक्षण; सांगलीत कारागृह प्रशासनाचा उपक्रम | पुढारी

महिला कैद्यांना मिळणार शिलाईचे प्रशिक्षण; सांगलीत कारागृह प्रशासनाचा उपक्रम

सचिन लाड

सांगली ः येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील महिला कैद्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी संगणक व शिलाई मशिनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला दिनानिमित्त लवकरच या उपक्रमास सुरुवात होणार आहे. राजवाडा चौकात कारागृह आहे. 235 क्षमता असलेल्या या कारागृहात सध्या साडेचारशेहून अधिक कैदी आहेत. यामध्ये 25 महिला कैदी आहेत. खुनाचा आरोप असलेल्या चार महिला आहेत. फसवणूक, अनैतिक मानवी व्यापार, चोरी व मारामारी असे गुन्हे दाखल असलेल्या 21 महिला आहेत. त्यांच्यासाठी स्वयंपाक खोलीजवळ स्वतंत्र बरॅक आहे.

प्रत्येकीला शासनाने दिलेली साडीच परिधान करण्याचे बंधनकारक आहेत. कळत न कळत त्यांच्या हातून गुन्हा घडलेला आहे. चार भिंतीच्या आत त्या कच्चे कैदी म्हणून आहेत. पूर्वी पाच ते सहा महिला होत्या. काही महिन्यांत जिल्ह्यातील गुन्हेगारी आलेखात नेहमी चढ-उतार राहिला आहे. अनेक गुन्ह्यांत महिलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक झाली. यातून कारागृहात संख्या वाढली. कारागृहातून सुटल्यानंतर त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे. भूतकाळात घडलेल्या अपराधाची आठवण येऊ नये, यासाठी कारागृह प्रशासनाने त्यांना संगणक व शिलाईचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. मशिन व संगणक खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधीची तरतूद झाली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात केली जाणार होती. पण फर्निचरचे काम अपूर्ण असल्याने प्रशिक्षणाचा प्रारंभ पुढे ढकलला आहे.

मुलासोबत राहण्याचा अधिकार

एखादा गुन्हा हातून घडला, तर महिलेला अटक होते. तिला लहान मूल असेल, तर त्याला सांभाळणार कोण? असा प्रश्न निर्माण होतो. यासाठी शासनाने पाच वर्षाच्या आतील मुलांना आईसोबत कारागृहास राहण्याचा अधिकार दिला आहे. सांगलीत सध्या एक महिला मुलासोबत कारागृहात राहत आहे. तोही चार भिंतीच्या आत आईसोबत राहत आहे.

Back to top button