Budget 2024 session | संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

Budget 2024 session | संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज बुधवार (दि. ३१) पासून सुरूवात होत आहे. हे अधिवेशन ९ फेब्रुवारीला संपेल. या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प (लेखानुदान) मांडतील. तत्पूर्वी, प्रथेप्रमाणे नवीन वर्षातील पहिल्या संसद अधिवेशनात राष्ट्रपतींचे अभिभाषण, आर्थिक पाहणी अहवाल सादरीकरणदेखील असेल. (Budget 2024 session)

१७ व्या लोकसभेचे अंतिम अधिवेशन आज ३१ जानेवारीला सुरू होत आहे. या अधिवेशनात केवळ आठ बैठका होतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनास प्रारंभ होईल. तर १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन लेखानुदान सादर करतील. अर्थसंकल्प सरकारच्या आर्थिक धोरणाचा दिशादर्शक दस्तावेज असल्याने लोकसभा निवडणूक वर्षात मावळते सरकार पूर्ण अर्थसंकल्प न मांडता केवळ लेखानुदान मांडत असते. तर, नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडला जात असतो. त्यानुसार यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अल्पकालावधीचे आहे.

सर्वसाधारणपणे लेखानुदान सादर करताना धोरणात्मक घोषणा करण्याचे टाळले जात असेल तरी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकानुनय घोषणा केल्या जातात. मोदी सरकारची शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये अर्थसहाय्य देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना २०१४ मध्ये लेखानुदान काळात जाहीर झाली होती. यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये हे अर्थसहाय्य ६००० रुपयांवरून १२००० रुपये करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून होऊ शकते, अशी चर्चा आहे.

निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा माजी अर्थमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाशी बरोबरी त्या करणार आहेत. सीतारामन यांनी सलग ५ पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. सहाव्यांदा त्या अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील आणि माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदंबरम आणि यशवंत सिन्हा यांनाही सीतारामन मागे टाकतील. या नेत्यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर केले होते. मोरारजीभाई देसाई यांनी १९५९-१९६४ दरम्यान पाच वार्षिक आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. पुढेही देसाई अर्थमंत्री झाले होते आणि त्यांच्या नावावर सर्वाधिक १० अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही आहे. (Budget 2024 session)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news