शिरोळ, पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाची औषधे कर्नाटकात, 40 हजार सिरिंज, तापावरील गोळ्या, पीपीई किट, देणगीतून मिळालेले साहित्य, बेकायदा जाळलेली औषधे, रेकॉर्ड, प्रसुती विभाग यासह अन्य बाबींची चौकशी करण्यासाठी रविवारी जिल्हा आरोग्य विभागाचे पथक सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे दाखल झाले होते.
दरम्यान लोकनियुक्त सरपंच हर्षदा पाटील आणि ज्ञानदेव पाटील यांच्यासह नागरिकांनी डॉ. ऐनापुरे यांच्या कामकाजासंदर्भातील तक्रारी नोंदवल्या. टाकळीकरांची जिरवण्याची भाषा करणाऱ्या ऐनापुरेंना तात्काळ निलंबित करावे. तसेच ही चौकशी जिल्हाधिकारी आणि शल्यचिकित्सकांच्या पथकाद्वारे करावी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तर सरंपच हर्षदा पाटील यांनी, शासकीय सेवा असताना इंजेक्शनसाठी 50 रुपये कसे घेतले जातात, असा सवाल उपस्थित केला.
सैनिक टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची चौकशी सुरू झाल्यामुळे 5 उपकेंद्रासह कार्यक्षेत्रातील पंधरा गावात खळबळ माजली आहे. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी चौकशी सुरू करण्यात आली. पथकाने रेकॉर्ड व्यवस्थित करण्याच्या सुचना देत पुन्हा अशा चुका केल्या तर गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
चौकशी पथकाचे प्रमुख डॉ. मदने हे दै. पुढारीशी बोलताना म्हणाले, "नागरिकांच्या तक्रारीनुसार सखोल आणि पारदर्शी चौकशी केली जाईल. तसेच निर्दोष व्यक्तींवर अन्याय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी जि.प.चे प्रशासन अधिकारी बाबासाहेब लांब, शिवाजी पाटील, अनिल पाटील, विनोद पाटील, संजय गायकवाड, अमर पाटील, अमोल संकपाळ, अजित कोळी आणि जावेद बालेभाई आदी उपस्थित होते.
हेही वाचा