Market Update : ढगाळ वातावरणामुळे आवक वाढली

Market Update : ढगाळ वातावरणामुळे आवक वाढली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढगाळ वातावरणामुळे फळभाज्यांसाठी पोषक वातावरण तयार होऊन उत्पादनात वाढ झाल्याने पुणे कृषी उत्पन्न समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात बहुतांश फळभाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी असल्याने हिरवी मिरची, फ्लॉवर, कोबी, ढोबळी मिरची, घेवडा व मटारच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. कांद्याचा नवा हंगाम सुरू झाल्याने शेतकर्‍यांकडून कांदा चाळीत साठविलेला कांदा बाजारात पाठविण्यास सुरुवात झाली आहे.

परिणामी, बाजारात कांद्याचीही आवक वाढली आहे. मागणीअभावी कांद्याचे दरही दहा टक्क्यांनी उतरल्याचे सांगण्यात आले. मागील आठवड्यात लसूण, काकडीच्या भावात वाढ झाल्याने त्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याने रविवारी बाजारात लसूणसह काकडीच्या भावातही घसरण झाली. उर्वरित सर्व फळभाज्यांचे गत आठवड्यातील भाव टिकून आहेत. गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि. 26) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे 14 ते 15 टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी 3 ते 4 टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून 2 ते 3 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 9 ते 10 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा 5 ते 6 टेम्पो, भुईमूग शेंग कर्नाटक येथून 2 टेम्पो, मध्य प्रदेश येथून 24 ते 25 ट्रक मटार, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 7 ते 8 टेम्पो आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 600 ते 700 गोणी, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, टोमॅटो सुमारे आठ ते दहा हजार क्रेट्स, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, गाजर 3 ते 4 टेम्पो, पावटा 6 ते 7 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा जुना आणि नवीन सुमारे 100 ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 30 ते 35 टेम्पो आवक झाल्याची माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news