

विश्रांतवाडी : पुढारी वृत्तसेवा : विश्रांतवाडी-विमानतळ रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या नसल्याने चित्र दिसून येत आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळ्यात विश्रांतवाडी-विमानतळ डांबरी रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतर या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. एचपी पेट्रोल पंप ते रस्ता क्रमांक तेरा दरम्यान हे काम पूर्ण झाले आहे. रस्ता क्रमांक तेरा ते सातपर्यंत पदपथाचे काम बाकी आहे. तिथून पुढे रस्ता अर्धवट अवस्थेत आहे. या रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी वर्दळ असते. त्यामुळे नाईलाजाने वाहनचालक अर्धवट तयार झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून वाहने चालवीत आहेत.
रस्त्याचे काम वेगाने सुरू असले, तरी या ठिकाणी परावर्तक पट्ट्या व धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. अर्धवट सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी बाहेर आलेल्या लोखंडी सळ्या, ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला मुरूम, रेती यांमुळे गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या रस्त्याचे काम वेगाने चालू आहे. पदपथाची स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदाराला वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचना देण्यात येईल.
-अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ), महापालिका.