पुढारी ऑनलाईन डेस्क : India Vs Pakistan Asia Cup : आशिया चषक स्पर्धेत शनिवारी (2 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात ब्लॉकबस्टर सामना खेळला जाणार आहे. या सामन्याबाबत जगभरातील चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ आपापली मते मांडत आहेत. काहींच्या नजरेत भारत फेव्हरेट आहे तर काहींच्या मते पाकिस्तान मजबूत आहे. वेगवेगळ्या डेटाद्वारे दोन्ही संघांची तुलना केली जात आहे. तसं पहिले तर मोठ्या सामन्यातील विजय आणि पराभव यातील फरक गोलंदाजी ठरवते. ज्या संघाची गोलंदाजी दबावाच्या क्षणी चांगली ठरते, तो संघ सामना जिंकण्यात यशस्वी होतो.
अशा परिस्थितीत दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजीत किती ताकद आहे हे आधी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. जेव्हा आपण भारत आणि पाकिस्तानच्या संघांकडे पाहतो तेव्हा आपल्याला दोन्ही संघांमध्ये 3-3 प्रिमियम वेगवान गोलंदाज दिसतात. भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजसारखे मजबूत वेगवान गोलंदाज आहेत. तर पाकिस्तान संघात शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ आहेत. (India Vs Pakistan Asia Cup)
जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी अलीकडच्या काळात फारसे सामने खेळलेले नाहीत. दुखापतीतून परतल्यानंतर बुमराहने आयर्लंडविरुद्ध फक्त 2 टी-20 सामने खेळले, ज्यात त्याने 4 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप दरम्यान शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यादरम्यान त्याने दोन्ही डावात 4 विकेट्स घेतल्या. डब्ल्यूटीसी फायनलनंतर शमीला संघ व्यवस्थापनाने विश्रांती दिली होती. शमीने आयपीएलपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला, ज्यामध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही. शमीने यावर्षी एकूण 8 वनडे खेळून 10 विकेट्स घेतल्या आहेत. (India Vs Pakistan Asia Cup)
मोहम्मद सिराजबद्दल सांगायचे तर तो शेवटचा वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्यानंतर सिराजने कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाच बळी घेतले. तेव्हापासून सिराजही रेस्ट मोडमध्ये आहे. बघितले तर, सिराजने मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. सिराजने 2023 मध्ये 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 19 विकेट घेतल्या आहेत.
पाकिस्तानचे तीनही वेगवान गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी अलीकडेच श्रीलंकेच्या भूमीवर अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी केली. तसेच, आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात तिघांनीही भेदक मारा केला. शाहीनने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत 6 विकेट घेतल्या होत्या. तर हॅरिसने वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात 5 विकेट घेत अफगाणिस्तान संघाचे कंबरडे मोडले होते. तर नसीम शाहला पहिल्या दोन सामन्यात 1-1 विकेट घेण्यात यश आले होते. दुसऱ्या वनडेतही नसीमने 5 चेंडूत 10 धावा करत पाकिस्तानला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
या वर्षी पाकिस्तानच्या तिन्ही गोलंदाजांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट राहिली आहे. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी 2023 मध्ये 8-8 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी 16-16 विकेट घेतल्या. तर हरिस रौफने 10 एकदिवसीय सामने खेळले आणि 17 विकेट घेतल्या. अलीकडच्या कामगिरीवर नजर टाकली तर पाकिस्तानी गोलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजांपेक्षा खूप पुढे दिसत आहेत. एकीकडे भारतीय वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट खेळलेले नाहीत. त्याचवेळी प्रर्तिस्पर्धी पाकचे वेगवान गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरुद्ध 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 4.97 च्या इकॉनॉमी रेटने 4 बळी घेतले आहेत. तर मोहम्मद शमीने पारंपरिक प्रतिस्पर्धी देशाविरुद्ध 3 वनडे सामन्यात 21.40 च्या सरासरीने 5 विकेट घेतल्या आहेत. बुमराह आणि शमीने पाकिस्तानविरुद्ध 3-3 टी-20 सामने खेळून 2-2 विकेट्सही घेतल्या आहेत. सिराज पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.
पाकिस्तानच्या त्रिकूट वेगवान गोलंदाजांपैकी फक्त शाहीनने भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट खेळले आहे. शाहीनने टीम इंडियाविरुद्ध एकमेव एकदिवसीय सामन्यात एकही विकेट घेण्यात यश आले आहे. शाहीन, नसीम आणि हरिस यांनीही भारताविरुद्ध अनुक्रमे 2, 3 आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान शाहीनने 3, नसीम आणि रौफने प्रत्येकी 4 बळी घेतले.
भारतीय वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत. बुमराह, शमी आणि सिराज यांनी एकूण 186 सामने खेळले आहेत, तर पाकिस्तानच्या वेगवान त्रिकुटाने एकूण 76 सामने खेळले आहेत. अशा स्थितीत भारतीय त्रिकुटाकडे 110 वनडे खेळण्याचा अधिक अनुभव आहे. जसप्रीत बुमराहने 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 24.30 च्या सरासरीने 121 विकेट घेतल्या आहेत. तर शमीने 90 सामन्यांत 25.98 च्या सरासरीने 162 विकेट घेतल्या आहेत. तर सिराजने 24 सामन्यांत 20.72 च्या सरासरीने 43 विकेट घेतल्या.
शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानसाठी 40 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 23.08 च्या सरासरीने 78 विकेट घेतल्या आहेत. नसीम शाहने 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 16.15 च्या सरासरीने 26 विकेट घेतल्या. तर तिसरा वेगवान गोलंदाज हारिस रौफने 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये 25.76 च्या सरासरीने 46 विकेट घेतल्या.