Budget 2022 : ‘या’ अर्थमंत्र्यांनी 800 शब्दात संपवलं होतं अर्थसंकल्पीय भाषण!

Budget 2022 : ‘या’ अर्थमंत्र्यांनी केवळ 800 शब्दात संपवलं होतं अर्थसंकल्पीय भाषण!
Budget 2022 : ‘या’ अर्थमंत्र्यांनी केवळ 800 शब्दात संपवलं होतं अर्थसंकल्पीय भाषण!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) 1 फेब्रुवारीला 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारामन सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याचबरोबर मोदी सरकारचा हा 10वा अर्थसंकल्प असेल. भारतातील अर्थसंकल्पाचा इतिहास खूप जुना आहे. याच्याशी संबंधित रंजक माहिती जाणून घेऊया.

भारतात प्रथमच 7 एप्रिल 1860 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित नेते जेम्स विल्सन यांनी भारताचा अर्थसंकल्प ब्रिटिश सम्राज्ञीसमोर ठेवला. यानंतर 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री आरके षणमुखम चेट्टी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. (Budget 2022)

सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांच्या नावावर आहे. 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी 2 तास 42 मिनिटांचे भाषण केले. यादरम्यान त्यांनी जुलै 2019 मध्ये केलेल्या स्वतःच्या 2 तास 17 मिनिटांच्या भाषणाचा विक्रम मोडला. मात्र, अर्थसंकल्पीय भाषणात सर्वाधिक शब्द बोलण्याचा विक्रम डॉ.मनमोहन सिंग यांच्या नावावर आहे. 1991 मधील त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात एकूण 18,650 शब्द होते. त्यापाठोपाठ अरुण जेटली यांचा क्रमांक लागतो, ज्यांच्या 2018 च्या अर्थसंकल्पीय भाषणात 18,604 शब्द होते. (Budget 2022)

सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण तत्कालीन अर्थमंत्री हिरुभाई मुळजीभाई पटेल यांनी 1977 मध्ये दिले होते. त्यांनी केवळ 800 शब्दांचे अर्थसंकल्पीय भाषण दिले. त्याचबरोबर सर्वाधिक अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे, ज्यांनी अर्थमंत्री असताना 1962-69 दरम्यान सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्यापाठोपाठ पी चिदंबरम (नऊ), प्रणव मुखर्जी (आठ), यशवंत सिन्हा (आठ) आणि मनमोहन सिंग (सहा) यांचा क्रमांक लागतो. (Budget 2022)

आता अर्थसंकल्पीय भाषणाची वेळ बदलली आहे. 1999 पर्यंत अर्थसंकल्पीय भाषण फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर केले जात होते. पण, यशवंत सिन्हा यांनी 1999 मध्ये यात बदल करून त्याची वेळ सकाळी 11 वाजता केली. यानंतर अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2017 मध्ये अर्थसंकल्पीय भाषण सादर केले आणि तेव्हापासून 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला जातो. (Budget 2022)

1955 पर्यंत अर्थसंकल्प फक्त इंग्रजीतच मांडला जायचा पण काँग्रेस सरकारने तो इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये मांडायला सुरुवात केली. ते कागदी दस्तऐवजाच्या स्वरूपात सादर केले गेले. पण, कोविड-19 महामारी आल्यानंतर 2021-22 चा अर्थसंकल्प पेपरलेस पद्धतीने सादर करण्यात आला. (Budget 2022)

2019 मध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) या दुसऱ्या महिला ठरल्या. त्यांच्या आधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1970 मध्ये अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता. 1969 मध्ये गांधी यांनी त्यांच्याच सरकारचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडून अर्थमंत्रालयाचा कार्यभार काढून घेतला होता. त्यामुळे 70 साली सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचे वाचन खुद्द इंदिरा गांधी यांना करावे लागले. मात्र, पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महिला अर्थमंत्री या निर्मला सीतारामनच आहेत.(Budget 2022)

सन 2017 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. पण, 2017 मध्ये रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश सर्वसाधारण अर्थसंकल्पातच करण्यात आला. आता फक्त एकच अर्थसंकल्प सादर होतो.

1950 पर्यंत अर्थसंकल्पाची छपाई राष्ट्रपती भवनात होत होती, परंतु ते लीक झाल्यानंतर मिंटो रोड, नवी दिल्ली येथील प्रेसमध्ये त्याची छपाई सुरू झाली. त्यानंतर 1980 मध्ये ते अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी प्रेसमध्ये छापण्यास सुरुवात झाली. आता बजेटच्या फार कमी प्रती छापल्या जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news